नाशिक : सेंटर फॉर सोशल टीचर्स, व केटीएचएम महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोशल सर्फिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत नवी दिल्लीच्या सेंटर फॉर सोशल रिसर्चच्या सुहासिनी मुखर्जी यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून सगळेच सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. यात फेसबुक, व्हॉट््स अॅप, टिष्ट्वटर, विचॅट, हाईक, इन्स्टाग्राम यांचा वापर छायाचित्र, माहितीचे आदान-प्रदान, व्हिडीओ चित्रीकरण पाठविणे यासाठी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मात्र या आॅनलाइन माध्यमाचा वापर करताना मर्यादा तसेच भानही राखावे, असेही त्यांनी सांगितले. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. पी. व्ही. कोटमे, प्रा. डॉ. एस. टी. पाटील, प्रा. संजय सावळे, प्रा. दीपक शिंदे उपस्थित होते. फेसबुकवर स्वत:च्या छायाचित्रांचा मर्यादित वापर करा. जर या माध्यमातून तुमचा कोणी पाठलाग (ट्रोलिंग) करत असेल तर इग्नोर, एंगेज, ब्लॉक व रिपोर्ट या चार घटकांचा वापर करून तुम्हाला सुरक्षित राहता येईल, असेही मुखर्जी यांनी सांगितले. सोशल माध्यमांचा वापर मर्यादित राहून योग्य ती काळजी घेऊन करायला हवा, असे आवाहनही प्रा. डॉ. एस. टी. पाटील यांनी केले. या कार्यशाळेत मुखर्जी, प्रियंका लोंढे यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातूनही माहिती सांगितली. यावेळी प्रा. उमेश शिंदे, प्रा. शशी माळवदे, प्रा. प्राची पिसोळकर, प्रा. योगेशकुमार होले उपस्थित होते.
केटीएचएम महाविद्यालयात ‘सोशल सर्फिंग’ कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:30 AM