नाशिक : पूर्वीची कविता ही कशिदा काढणारी होती. साहित्यही माणसाला आनंद देणारे होते. याउलट दलित साहित्याने माणसाला अस्वस्थ केले आणि दलित कवितेने मराठी साहित्याचा चेहरामोहराच बदलून टाकला, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक व विचारवंत प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांनी केले. कवी कैलास पगारे यांचा नागरी सत्कार व त्यांच्या ‘माणूसनामा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झाले, त्यावेळी ते बोलत होते. कवी पगारे व त्यांच्या पत्नी यशोदा पगारे यांचा मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील, महापौर अशोक मुर्तडक उपस्थित होते. पानतावणे म्हणाले की, माणुसकीचे अवमूल्यन करणारी प्रस्थापित मूल्ये विद्रोहाद्वारे नाकारली जातात. डॉ. आंबेडकरांनी दलितांना विद्रोहाची ताकद दिली. ज्यांचे सांस्कृतिक दमन झाले, त्यांना परिवर्तनाचे बोट धरून पुढे जाण्याची जाणीव दलित कवितेतून मिळते. आपली भाषा, प्रतिके, प्रतिमा या आंबेडकरी तत्त्वज्ञानातून आल्या आहेत. त्यामुळे त्यांची मुद्रा स्वतंत्र आहे. आपली भाषा कोणताही परिवेश चढवून आलेली नाही. ती दु:खातून आली आहे. त्यामुळे या भाषेतील साहित्य माणसाला अस्वस्थ करते. अध्यक्षीय भाषणात कसबे म्हणाले की, माणूस या प्राण्याने संस्कृती बनवली म्हणून तो माणूस बनला. काव्य, कला, क्रीडा हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. कविता ज्याच्या जगण्याची गरज बनते, तोच खरा माणूस बनतो. उत्तम कलावंत हाच उत्तम माणूस बनू शकतो. महापौर मुर्तडक यांनीही मनोगत व्यक्त केले. कवी पगारे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, राज्य घटनेने आपल्याला लिहिण्याचा, बोलण्याचा हक्क दिला आहे. बोलण्याने व्यवस्था बदलू शकते. तेव्हा प्रत्येकाने बोलायला हवे. विनायकदादा पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मनीषा जगताप यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रा. महादेव कांबळे यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रा. विवेक खरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विशाल जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
कैलास पगारे यांच्या ‘माणूसनामा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
By admin | Published: February 02, 2015 12:48 AM