नाशिक : भारतातील बालकांचे बालपण हरवत चालले असून, अनेकांचे लैंगिक शोषण केले जाते. बालकांसंदर्भात चांगले व सक्षम कायदे व्हावेत तसेच समाजातील विनयभंग, लैंगिक अत्याचार यासारख्या अपप्रवृत्ती नष्ट करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व नोबेल पुरस्कार प्राप्त कैलास सत्यार्थी यांच्या चिल्ड्रेन फाउंडेशन व सहयोगी संस्थांच्या वतीने दि. ११ सप्टेंबर ते १६ आॅक्टोबरपर्यंत कन्याकुमारी ते दिल्ली अशी ११ हजार किलोमीटरची भारत यात्रा काढण्यात येणार आहे. सदर यात्रा दि. २९ रोजी नाशिक येथे दाखल होणार आहे.‘सुरक्षित बालपण, सुरक्षित भारत’ यात्रेसंदर्भात नाशिक जिल्हा स्वयंसेवी संघटनेची (एन.जी.ओ. फोरम) बैठक अध्यक्ष मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली संभाजी चौकातील सभागृहात झाली. यावेळी बचपन बचाओ आंदोलनाचे समन्वयक जुनेदखान (नवी दिल्ली), राज्य समन्वयक अॅड. आनंद महाजन, किरण थोरात उपस्थित होते. यावेळी बचपन बचाओ आंदोलनाच्या समन्वयकांनी भारत यात्रेचा उद्देश स्पष्ट केला. सदर यात्रा महाराष्ट्रात दि. २५ सप्टेंबरला सोलापूर येथे येणार असून, दि. २६ रोजी पुणे, २७ रोजी मुंबई, २९ रोजी नाशिक, ३० रोजी धुळे येथून मध्य प्रदेशात जाणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. बैठकीला राजू शिरसाठ, हेमा पटवर्धन, आसावरी देशपांडे, शोभा पवार, प्रमोद जाधव, डॉ. प्रभाकर वडजे, डॉ. प्रकाश अहेर, अविनाश पाटील, अश्विनी न्याहरकर, अमोल जोशी, नितीन सोनवणे आदी उपस्थित होते.
कैलास सत्यार्थी यांची ‘सुरक्षित बालपण’ भारत यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 1:16 AM