नाशिक : ‘रोलेट’ या ऑनलाइन जुगाराच्या आहारी जाऊन त्र्यंबकेश्वरमध्ये काही दिवसांपुर्वी एका ३६वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात रोलेट जुगार खेळविणाऱ्या संशयित कैलास शहा व त्याच्या दोघा साथीदारांविरुद्ध तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात शहा हा मागील काही दिवसांपासून पोलिसांना हवा होता. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने त्यास नाशिकमधून शिताफीने बुधवारी (दि.१०) रात्री नाशिक शहरातून अटक केली.
‘रोलेट’ नावाचा जुगाराने शहरासह ग्रामीण भागातदेखील थैमान घातल्याने अनेक तरुण या जुगाराच्या आहारी गेल्याचे बोलले जात आहे. या जुगारामध्ये लाखो रुपयांवर पाणी सोडावे लागल्याने आलेल्या नैराश्यापोटी नामदेव चव्हाण नामक व्यक्तीने आपले जीवन संपविल्याची घटना त्र्यंबकेश्वर भागातील आंबोलीमध्ये महिनाभरापुर्वी घडली होती. दरम्यान, याप्रकरणी त्र्यंबकेश्वरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयित शहा याचा ग्रामीण पोलीस शोध घेत होते. अखेर त्यास नाशिकमधून ताब्यात घेण्यास बुधवारी पोलिसांना यश आले. त्याच्याविरुध्द भारतीय दंड विधान कलम ३०६प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.