नाशिक : शहरासह जिल्ह्यात रौलेट जुगाराचे नेटवर्क चालविणारा संशयित कैलास जोगेंद्रप्रसाद शहा याची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणातील संशयित प्रीतम गोसावीसह अन्य तीन ते चार संशयित अजूनही फरार असून, पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात निफाड तालुक्यातील वावी ठुशी येथील रहिवासी फिर्यादी रामराव बबन रसाळ (३७) याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित कैलास शहाविरुद्ध जुगारबंदी कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलिसांना तो आणि त्याचा साथीदार प्रीतम राजेंद्र गोसावी (रा. पिंपळगाव) हे दोघे हवे होते. यातील कैलास शहा याला पोलिसांनी अटक करून मंगळवारी (दि.१९) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ठोठावलेली पोलीस कोठडी गुरुवारी (दि.२२) संपुष्टात आल्याने पोलिसांनी गुरुवारी पुन्हा शाहला न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी कैलास शाहचा मोबाईल व रौलेट जुगार खेळविण्याचे काही साहित्य हस्तगत केले असून, त्याचा साथीदार प्रीतम गोसावीसह अन्य तीन - चार संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.