मालेगाव : येथील मालेगाव मध्यचे आमदार आसिफ शेख व माजी आमदार रशीद शेख हे पिता-पुत्र आणि दुसरीकडे महापौर हाजी मोहंमद इब्राहिंम व उपमहापौर हाजी मोहंमद युनूस ईसा शेख यांच्यात सध्या शहर विकास आराखडा, आरक्षित जमिनींचा विकास व मनपा महासभेतील मंजूर झालेल्या विषयांवरून कलगीतुरा रंगला आहे. मात्र यातून केवळ राजकीय उणेदुण्याचे नाट्य न रंगता त्यातून नेमका शहर विकासास हातभार लागावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.विधानसभा निवडणुका व मनपातील झालेल्या महापौर - उपमहापौर पदांच्या निवडणुकीनंतर शहरातील राजकीय परिस्थिती आणि समीकरणांमध्ये बदल झालेला आहे. काँग्रेसचे निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार आसिफ शेख व माजी आमदार रशीद शेख हे पिता-पुत्र एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल, विद्यमान महापौर हाजी मोहम्मद इब्राहिम, उपमहापौर हाजी युनूस ईसा आणि सहकारी पक्ष अशी राजकीय स्थिती आहे. एकीकडे आमदारकी तर दुसरीकडे मनपाची सत्ता अशा परस्परविरोधी गडकिल्ल्यावरून एकमेकांविरोधात राजकीय आरोप- प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे केले जात आहेत. मनपाने विकास आराखडा आखताना विविध नागरी सुविधा नागरिकांना पुरविण्यासाठी ज्या जागा आरक्षित केल्या त्या आरक्षणांचा उपयोग होत नसल्याचे आढळून आले आहे. जागा आरक्षित करताना शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून वर्दळ कमी व्हावी यासाठी पार्किंग झोनची व्यवस्था व्हावी, टाउन हॉल बांधावा, नवीन अग्निशमन केंद्र व्हावे, झोपडपट्टी भागात व त्यालगत प्राथमिक शाळा व मैदानाची व्यवस्था करावी असा उद्देश होता. मात्र या आरक्षित जागांपैकी काही जागांवर मनपातर्फे व्यापारी संकुलांचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यात मनपाच्या आर्थिक फायद्यापेक्षा मनपातील संबंधित राजकीय व पदाधिकाऱ्यांच्या आर्थिक लागेबांध्याचा विचार जास्त असल्याचा आरोप आमदार शेख यांनी केला आहे. अशा प्रकारांमुळे आरक्षित जागांच्या मूळ उद्देशास हरताळ फासला गेला आहे. परिणामी मनपाने विकास आराखडा मंजूर करताना ज्या विविध आरक्षणांवर मंजुरी दिली त्या आरक्षणाप्रमाणे जागेचा उपयोग व्हावा अशी मागणी आमदार शेख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अशा प्रकारच्या मागणीतून आमदार शेख यांनी मनपातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. थेट राज्य शासनाकडे याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तसेच दुसरीकडे सर्वसामान्य मालेगावकर जनतेत मनपातील सत्ताधाऱ्यांविरोधात रोष निर्माण होईल अशी व्यवस्था केली. मात्र महापौर व उपमहापौर यांनी याप्रश्नीदेखील ठरावीक भागातीलच आरक्षित जागेचा प्रश्न आमदारानी का उपस्थित केला आहे, असा प्रतिप्रश्न करत परतफेड केली आहे. महासभेत रविवार वॉर्ड भागात झोपडपट्टी भागात दुकानांसाठी लोखंडी कॅबिन उभारण्याचा विषय मंजूर करण्यात आला. त्यास माजी महापौर ताहेरा शेख यांनी केलेला विरोध डावलण्यात आला. शहराला नवीन आमदार आणि नवीन महापौर - उपमहापौर लाभल्यानंतर आता शहराच्या विकासकामांना वाव मिळेल, नवीन दिशा मिळेल, शहराचे प्रश्न - समस्या सुटतील अशी सर्वसामान्य मालेगावकरांची अपेक्षा होती. मात्र या सर्व राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या गदारोळात शहरातील प्रश्न - समस्या मात्र जैसे थे आहे. (प्रतिनिधी)
कलगीतुरा : विकासकामांच्या स्पर्धेऐवजी उणेदुणे
By admin | Published: January 22, 2015 12:25 AM