पाथरे : राज्यातील विद्यार्थ्यांना दहावीनंतरचे करिअर निवडण्यासाठी तसेच त्यांच्यामधील अभिरूची आणि अभिक्षमता समजावी, यासाठी राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांतून घेण्यात येणारी ‘कलचाचणी’ हा उपक्रम यंदा महाकरिअर मोबाईल अॅपद्वारे घेण्यात येणार आहे.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे (विद्या प्राधिकरण) व श्यामची आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी इयत्ता दहावीसाठी कलमापन चाचणी आयोजित केली जाते. यंदा ही कलमापन चाचणी महाकरिअर मोबाईल अॅपव्दारे घेण्यात येणार आहे. त्यानुसार तालुक्यातील सर्व शाळांतील दहावीचा वर्ग शिकविणाऱ्या एक किंवा दोन तंत्रस्नेही शिक्षकास तालुकास्तरीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या चाचणीतून विद्यार्थ्यांला आपली आवड व दिलेले प्राधान्य हे यातून कळणार आहे. या चाचणीतून कोणतेही गुण नाहीत त्याच बरोबर कोणतेही उत्तर हे चूक किंवा बरोबर नाही. यात अभिक्षमता ओळखण्यासाठी भाषिक, तार्किक, अवकाशीय आणि सांख्याकीय मूल्यमापन होणार आहे. १८ डिसेंबर ते १७ जानेवारी या कालावधीत ही चाचणी घेण्यात येणार आहे. एका विद्यार्थ्याला ९० मिनिटांचा कालावधी मिळणार आहे. याबाबतच्या सर्व सूचना प्रत्येक शाळेवरील तंत्रस्नेही शिक्षणांना करण्यात आल्या आहेत. ज्या शाळेत विद्यार्थी संख्या १०० पेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी तंत्रस्नेही शिक्षकांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. मोबाईलची संख्या जर कमी असेल तर वेळेचे नियोजन अवघड होण्याची शक्यता आहे.
‘कलचाचणी’ उपक्रम यंदापासून होणार ‘महाकरिअर मोबाईल अॅप’द्वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 5:55 PM