नाशिक : महापालिकेच्या महाकवी कलामंदिराच्या भाडेवाढीवरून कलावंतांसह सर्वच क्षेत्रात संताप व्यक्त केला जात असल्याने स्थायी समितीकडून दरवाढ कमी होईल या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. शुक्रवारी (दि. २१) झालेल्या बैठकीत अल्पशा दिला असून, चार हजार रुपयांची दरवाढ पाचपटच ठेवताना केवळ पाचशे रुपयांपेक्षा कमी तिकीट दर असलेल्या कार्यक्रमांना साडेतीन पट करण्याचा निर्णय समितीने दिला आहे. त्यामुळे कलावंतांना अपेक्षित दिलासा मिळाला नाही. महापालिकेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिराचे तसेच त्यालगत असलेल्या महात्मा फुले कलादालनाचे नूतनीकरण करण्यात आले असून, त्यासाठी ९ कोटी ३० लाख रुपये खर्च करण्यात आले असून, त्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दरवाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. स्थायी समितीवर सादर करण्यापूर्वीच त्याला कलावंतांनी कडाकडून विरोध केला असून, मुंबई आणि पुण्याच्या कलावंतांनी तर नाशिकला नाटकच आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार देवयानी फरांदे यांनी कलावंतांसह आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली होती. त्यानुसार त्यांनी दर कमी करण्याचे आश्वासन दिले असले तरी त्यांनी यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर केले असल्याने एरव्ही आयुक्तांच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या कोर्टात हा चेंडू गेला होता. परंतु त्यातून फार काही निष्पन्न झाले नाही. कलामंदिराच्या भाड्यात दरवर्षी पाच टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आयुक्त मुंढे यांनी सादर केला होता. मात्र तीन वर्षांतून एकदा पाच टक्के वाढ करण्यात येईल, असे सभापती हिमगौरी आडके यांनी सांगतानाच महात्मा फुले कलादालनाची प्रस्तावित दरवाढ मात्र मंजूर केली आहे. या ठिकाणी लग्न सोहळ्यांवर मात्र बंदी घालण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने पूर्वी कालिदास कलामंदिरात होणाºया पाच प्रकारांत वर्गीकरण करण्यात आले होते. मात्र ते आता तीन प्रकारांत करण्यात आले आहे. त्यातील नाटकांसाठी पूर्वी तिसºया सत्राचे म्हणजे रात्रीच्या नाटकाचे किंवा शास्त्रीय गायन आणि नृत्य या कार्यक्रमासाठी दर चार हजार रुपयांवरून थेट पाचपट करण्यात आले होते. २१ हजार रुपये अधिक जीएसटी असे दर होते मात्र त्यात बदल करून हे दर कमी करताना स्थायी समितीने अत्यल्प कपात कपात केली आहे. पाचशे रुपयांच्या आत तिकिटाचे दर असतील तर त्यासाठी सकाळ सत्र दहा हजार, दुपार सत्र १२ हजार आणि तिसºया सत्रात १४ हजार रुपये मोजावे लागतील. तर पाचशे रुपयांपेक्षा जास्त दर असलेल्या कार्यक्रमाचे दर हे सकाळ सत्रासाठी १५ हजार, दुपार सत्रासाठी १७ हजार आणि रात्रीच्या प्राइम टाइमसाठी २० हजार रुपये मोजावे लागतील त्यानुसार रंगीत तालीम, बालनाट्य, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, जादूचे प्रयोग, हौशी नाटक, व्याख्यान, शासकीय कार्यालयाच्या कार्यशाळा तसेच यासाठी पूर्वी सकाळच्या सत्रासाठी सहा हजार रुपये दर प्रस्तावित होते ते ४ हजार ५०० रुपये करण्यात आले असून, त्यानंतर दुसºया सत्रासाठी असलेले ८००० रुपयांवरून ६००० रुपयांवर आणि तिसºया सत्रासाठी ११ हजार रुपये असलेले दर आठ हजार रुपये असे करण्यात आले आहेत. आर्केस्ट्रा, कार्यशाळा आणि अन्य कार्यक्रमासाठी २५ हजार, २७ हजार आणि २९ हजार रुपये असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय सत्रासाठी करण्यात आले आहेत. स्थायी समितीकडून अपेक्षित दर कमी करण्यात न आल्याने पुन्हा एकदा सांस्कृतिक क्षेत्र तापण्याची शक्यता आहे.नाशिकला सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी परंपरा आहे. त्यामुळे दरवाढ अल्प करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. दरवाढ ही सांस्कृतिक कार्यक्रमावर घाला असल्याचे मत समीर कांबळे यांनी व्यक्त केले. याशिवाय महापालिका ही नफा कमवणारी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नसल्याचे सांगून अशा प्रकारे दरवाढ केल्यास कलावंत पाठ फिरवतील असा इशारा दिला आहे. चर्चेत दिनकर पाटील, संगीता जाधव, संतोष साळवे भागवत आरोटे यांनी भाग घेतला.‘मग, नाशिककरांना चार रुपयांचे तिकीट का नाही?’महापालिकेने यापूर्वी कालिदास कलामंदिराचे भाडे वाढवले नाही. मूळ भाडे चार हजार रुपये असताना तारखा आगाऊ बुकिंग करणाºयांनी नंतर कोणाला कार्यक्रम घ्यायचा असेल तर सोळा-सोळा हजार रुपये वसूल करीत होते तेव्हा कोणीच का ओरड केली नाही? असा प्रश्न आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. कालिदासची दरवाढ करण्यापूर्वी गेल्या पाच वर्षांत किती आणि कोणते कार्यक्रम घेतले, त्यासाठी असलेले तिकीट दर आणि कलामंदिराची व्याप्त झालेली आसने या सर्वांचा हिशेब तपासण्यात आला. त्यानंतरच महापालिकेने ताळेबंद तयार केला. कालिदासमधील नाटकांचा विचार केला तर यापूर्वी चार रुपयांना तिकीट दर असायला हवे होते किमान पंचवीस, पन्नास रुपये सुद्धा चालू शकले असते मग यापेक्षा जास्त दर आकारले गेले त्याचे काय? असा प्रश्न त्यांनी केला. कलामंदिर नवीन नाही असा मुद्दा असला तरी भिंती आणि छत पाडणे सोडून बाकी सर्व नूतनीकरण करण्यात आल्याचे मुंढे यांनी सांगितले.कालिदासमधील ध्वनी यंत्रणेसह तांत्रिक कामे चालविण्यासाठी तसेच स्वच्छतेच्या कामासाठी खासगीकरणातून एजन्सी नियुक्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कलामंदिराच्या दरवाढीतून किमान आठ दहा वर्षे देखभाल चांगली व्हावी यासाठी दरवाढीचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.
‘कालिदास’ दरवाढ; स्थायी समितीकडून अंशत: दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 1:28 AM