नाशिक : महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिराला स्मार्ट करण्यात आल्यानंतर आता यासंदर्भात भाडेवाढीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्याचप्रमाणे अंशत: खासगीकरण करायचे की पूर्णत: याबाबतदेखील लवकरच निर्णय होणार आहे. शहरातील सांस्कृतिक वास्तू म्हणून महाकवी कालिदास कलामंदिराचे महत्त्व आहे. मात्र या वास्तूची दुरवस्था होत असल्याने कलावंतांनी नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे महापालिकेने या प्रकरणात लक्ष घातले होते. स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेने या इमारतीचे नवनिर्माण केले असून, अनेक चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यात आल्यात आहेत. विशेषत: आरामदायी खुर्च्या, आकर्षक प्रकाशव्यवस्था तसेच ध्वनिव्यवस्था अद्ययावत करण्यात आली असून, वातानुकूलन यंत्रातही बदल करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर महाकवी कालिदास कलामंदिराचे लोकार्पण नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात येणार असून, तीन दिवस स्थानिक कलावंतांचे भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. महाकवी कालिदास कलामंदिराला वर्षाकाठी सव्वा दोन कोटी रुपयांचा आस्थापना खर्च असून, त्या तुलनेत एका सत्राचे भाडे चार ते साडेचार हजार इतके आहे. मुंबई, पुण्यात कैकपटीने अधिक आहेत. त्यामुळे कालिदासचे भाडे वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कालिदास कलामंदिराचे अंशत: किंवा पूर्णत: खासगीकरण करण्याबाबतदेखील निर्णय घेण्यात येणार आहे.
कालिदास कलामंदिरच्या भाडेवाढीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 1:34 AM