नाशिक : काळसेकर हे अत्यंत रुजू आणि विश्वासू, असे आमचे चळवळीतील साथीदार होते. जातीपातींच्या पलीकडे भूमिका घेणारा मित्र म्हणून आम्ही या ग्रंथवेड्या माणसाकडे पाहायचो. पुस्तकांसाठी घर बांधणारा हा एक अस्सल वाचक आणि चळवळ्या मित्र होता. त्याच्या जाण्याने साहित्य चळवळ आणि वाचक चळवळीची अपरिमित हानी झाली असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांनी सांगितले.
साहित्य अकादमीप्राप्त साहित्यिक, तसेच प्रगतिशील लेखक संघाचे महाराष्ट्राचे राज्यध्यक्ष सतीश काळसेकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी प्रगतिशील लेखक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ऑनलाइन अभिवादन सभा पार पडली. यावेळी साहित्य-संस्कृती कला भाषा, तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी संवेदना व्यक्त केल्या. या अभिवादन सभेचे अध्यक्षस्थानी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले होते. देवीदास तुळजापूरकर यांनी मध्यमवर्गीय जाणिवांच्या पलीकडे जाऊन पाहणारा मोठा माणूस गमावल्याचे नमूद केले. भाकपचे राष्ट्रीय नेते भालचंद्र कांगो यांनी निधी मिळणे आटल्यानंतरही लोकवाङ्मयगृह अत्यंत कसोटीने चालविण्याची जबाबदारी काळसेकर यांनी खांद्यावर घेत ती पार पाडल्याचे सांगितले. प्रा. गंगाधर आहिरे यांनी नाशिकशी संबंधित काळसेकर यांच्या आठवणी सांगितल्या. इप्टा चळवळीचे राष्ट्रीय सचिव राकेश कुमार यांनी सांगितले की, काळसेकर हे केवळ मराठीतले नसून देशातील मुख्य धारेचे लेखक होते. विनीत तिवारी यांनी या अभिवादन सभेत मांडलेल्या सर्व प्रस्तावांना अनुमोदन दिले. यावेळी श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी पाच दशकांपासूनच्या आठवणी जागवल्या. अविनाश कोल्हे, रणधीर शिंदे, किशोर ढमाले, नामदेव गावडे, क्रांती जेजूरकर, डॉ. श्रीधर पवार, बाबूराव गुरव, सुरेश साबळे, अनिल चव्हाण, राजेंद्र मुंडे, डॉ. समाधान इंगळे, राजकुमार कदम, दयानंद कनकदंडे, लता भिसे, उदय चौधरी, गिरीश फोंडे यांनी आपल्या आठवणी व्यक्त केल्या. या अभिवादन सभेचे संयोजन प्रगतिशील लेखक संघाचे महाराष्ट्राचे महासचिव तथा कादंबरीकार राकेश वानखेडे यांनी केले. प्रास्ताविकामध्ये वानखेडे यांनी सतीश काळसेकर यांच्यावर डॉक्युमेंटरी, तसेच स्मरणिका काढावी, त्याचबरोबर आठवडाभर व्याख्यानमाला चालवावी, असा प्रस्ताव ठेवला होता, ज्याला सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
इन्फो
प्रागतिक भूमिका असलेला साहित्यिक गमावला
यावेळी बोलताना वसंत आबाजी डहाके म्हणाले की, १९६७ पासून पाच दशकांहून अधिक काळाची आमची मैत्री आहे. अलीकडे हिमालयात गेलो. त्याचबरोबर तीनदा सतीशसह उत्तरांचलला गेलो. माणसाकडे पाहण्याचा त्याचा एक अत्यंत चांगला दृष्टिकोन होता. मराठी भाषा समृद्ध करणारा आणि एक प्रागतिक भूमिका घेणाऱ्या मोठ्या साहित्यिकाला आपण गमावले असल्याचे डहाके यांनी नमूद केले.