कळवण : तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटरअभावी नाशिक,मालेगावसारख्या ठिकाणी जावे लागत असल्याचे वास्तव समोर आल्यानंतर आता येत्या दोन दिवसात कळवण येथील डेडिकेटेड कोविड केयर सेंटरमध्ये पाच व्हेंटिलेटर कार्यान्वित होणार असल्याने अत्यवस्थ रुग्णांची सोय होण्यास मदत होणार आहे.
कळवण तालुक्यात गेल्या महिन्याभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे रुग्ण संख्या वाढत असताना दुसरीकडे सुविधा मात्र तोकड्या पडत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे प्रशासन आता अधिक सतर्क झाले असून येत्या दोन दिवसात व्हेंटिलेटर कार्यान्वित केले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.
मानुर येथील डेडिकेटेड कोविड केयर सेंटरमध्ये पाच व्हेंटिलेटर बसवले जाणार असून ते येत्या दोन दिवसात कार्यान्वित केले जाणार असल्याचे आमदार नितीन पवार यांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या व्हेंटिलेटरपैकी पाच व्हेंटिलेटर कोरोना रुग्णांसाठी कार्यान्वित केले जाणार असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे.
-------------------------
सद्यस्थितीत मानुर येथील डेडिकेटेड कोविड केयर सेंटरमध्ये व्हेंटिलेटर इन्स्टॉल करण्याचे काम सुरू करण्यात आलेले असून येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण होऊन व्हेंटिलेटर कार्यान्वित होतील, अशी अपेक्षा आहे. मात्र,प्रशासनाने आता वेळ वाया न घालवता रुग्णांची निकड लक्षात घेऊन तातडीने व्हेंटिलेटर सुविधा कार्यान्वित करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे. व्हेंटिलेटर सुविधा ही कोरोनाचा प्रभाव ओसरेपर्यंत कार्यरत राहावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.