कळवण : येथील नगरपंचायत हद्दीत ११७ घरे, इमारती, वाडे, इमारतींचा भाग धोकादायक स्वरूपाच्या आहेत. त्यांनी नगरपंचायतीच्या पूर्वपरवानगीने पावसाळ्यापूर्वी तत्काळ पाडून टाकण्याच्या सूचना प्रशासनाने नोटिसीद्वारे दिली असून, शहरामध्ये साथीचे आजार पसरू नये यासाठी पावसाळापूर्व कामांना सुरुवात केली असून, शहरातील गटार, नाले साफसफाईला प्राधान्य दिले आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एसटी बसस्थानकाजवळील नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्यामुळे शहरातील इतर विकासकामांबरोबर नाल्याच्या साफसफाईच्या कामाला नगरपंचायतीने प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा कळवणकर जनतेने व्यक्त केली आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे कळवण शहर व तालुक्याच्या परिसरात अवकाळी पावसाचे आगमन झाले. वादळ-वाऱ्यामुळे तालुक्यात शेतातील व रस्त्यावरील झाडे पडली. साधारणतः माॅन्सूनच्या महिनाभर आधीच थोड्याफार प्रमाणात पावसास सुरुवात झाली असल्याने त्यापूर्वीच कळवण नगरपंचायत प्रशासनाकडून साफसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. सफाई कर्मचारी व ठेकेदारी कामगारांच्या माध्यमातून नालेसफाईचे, गटार साफ करणे, त्यामध्ये आलेले गवत काढणे आदी कामे सुरू करण्यात आले असून, नगरपंचायतीच्या फंडातून ही कामे करण्यात आली.
-------------
झाडांच्या फांद्यावर कुऱ्हाड
कळवण नगरपंचायत प्रशासनाने महावितरणला पावसाळापूर्वी नादुरुस्त झालेल्या विद्युत वाहिनींवर आलेल्या धोकादायक फांद्या हटवण्याचे लेखी पत्र दिल्याने मागील सप्ताहात महावितरणने शनिवारी पावसाळ्यापूर्वीच्या कामांना प्राधान्य देऊन वीजतारांना अडचणी ठरणाऱ्या झाडांच्या फांदयांवर कुऱ्हाड फिरवली. नगरपंचायतीने देखील गटार, नालेसफाई कामाबरोबर झाडांच्या तुटलेल्या फांद्या काढण्याचे कामास प्राधान्यक्रम दिले आहे.
--------------------
कोरोनाचा ‘नो इफेक्ट’
कोरोनामुळे मागील व चालूवर्षी झालेल्या लॉकडाऊनचा कळवण नगरपंचायतीच्या विकासकामांना चांगलाच फायदा झाला. कुठल्याही विकासकामांना ब्रेक लागला नाही. कळवण नगरपंचायतीला आमदार नितीन पवार यांनी केलेल्या सूचनांमुळे विकासकामे पूर्ण करण्यात यश आले. गावअंतर्गत रहदारी ठप्प झाल्यामुळे शहरांतर्गत रस्ते विकासाला प्राधान्य मिळून दर्जेदार रस्ते तयार झाले. नगरपंचायत हद्दीत ११७ घरे धोकादायक असून, त्यांना नगरपंचायत प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली असून, पावसाळापूर्वीच्या कामांना नगरपंचायतीला शासनस्तरावरून कोणताही विशेष निधी मिळाला नसल्याने सर्वसाधारण नगरपंचायत फंडातून ही कामे मार्गी लावावी लागतात. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, शहरामध्ये साथीचे आजार पसरू नये यासाठी शहरातील ओढे, नाले, गटारीची साफसफाई कामांना नगरपंचायत प्राधान्य दिले आहे.
-----------------
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने नगरपंचायतीने विविध उपाययोजना करत संसर्ग टाळण्यासाठी पोलीस, आरोग्य विभागाच्या बरोबरीने नगरपंचायत प्रशासनाने खांद्याला खांदा लावून काम केले. याचा परिणाम नगरपंचायतीच्या कारभारावर झाला. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच्या कामांना शासनस्तरावरून निधी उपलब्ध होत नसल्याने नगरपंचायत फंडातून ही कामे मार्गी लावत आहे. शहरातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने साफसफाई कामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.
-डॉ. सचिन पटेल, मुख्याधिकारी