कळवण : यंदा मराठी नववर्षाच्या अर्थात गुढीपाडवा सणावर सलग दुसऱ्या वर्षी ‘कोरोना’चे सावट दिसून आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे शहरात जनता कर्फ्यू पाळण्यात आला असल्यामुळे यंदा नेहमीच्या उत्साहाला फाटा देत साधेपणाने गुढी उभारण्यात आल्याचे चित्र कळवण शहरात व तालुक्यात दिसून आले. जनता कर्फ्यू आणि ‘ब्रेक द चेन’मुळे पाडव्याची तालुक्यात लाखोंची उलाढाल ठप्प झाली. सोशल मीडियावरदेखील ऐक्याची गुढी उभारून जगावरील ‘कोरोना’चे संकट टळण्याचे साकडे घातले गेले. गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. अनेक कुटुंबे घरासमोर गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करतात; परंतु यंदाच्या गुढीपाडव्यावर मागील वर्षाप्रमाणे ‘कोरोना’चे सावट पसरले होते.
गुढीपाडव्यानिमित्त हारडे कंगन माळ व इतर वस्तूंचे स्टॉल सजले जातात; परंतु यंदा ‘ब्रेक द चेन’ आणि कळवण शहरातील जनता कर्फ्यूमुळे यंदा हे चित्र बघायला मिळाले नाही. यंदाचा पाडवा साधेपणाने साजरा करा, असा संदेश ‘व्हॉटस्ॲप’वर फिरत होता. गुढीसाठी हारडे कंगन माळ, कडुनिंबाची डहाळी नाही मिळाली तरी पारंपरिक पद्धतीऐवजी घरी असलेल्या काठीस रेशमी वस्त्र बांधून पूजन करून जगाच्या आरोग्यासाठी शिस्तीचे पालन करेन, अशी प्रार्थना करण्याचे आवाहन केले गेले. त्याला आज प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसले.
अनेकांनी घरासमोर, बंगल्याच्या टेरेसवर, फ्लॅटच्या खिडकीत गुढी उभारली, तर अनेकांनी यंदा गुढी उभारली नसल्याचे दिसले. त्याऐवजी केवळ सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाच्या शुभेच्छांच्या पाऊस प्रतिवर्षी ‘व्हॉटस्ॲप’ आणि ‘फेसबुक’ वर पडतो; परंतु सोशल मीडियावरील गुढीपाडव्याच्या शुभेच्छांवर ‘कोरोना’चे सावट दिसले. अनेकांनी पारंपरिक शुभेच्छांऐवजी ‘कोरोना’च्या संकटावर मात करण्यासाठी ऐक्याची गुढी उभारा, असा संदेश दिला. जगावरील संकट टळून सर्वांना निरोगी आरोग्य लाभो, अशाही अनेकांनी शुभेच्छा दिल्या.