ममदापूर : येवला तालुक्यातील खरवंडी येथे विहिरीत पडलेला काळवीटाला वनविभागाच्या कर्मचारी व ग्रामस्थांनी बाहेर काढल्याने जीवदान मिळाले.सध्या दुष्काळामुळे परिसरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने माणसा सह पशुपक्षांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी पंचाईत झाली आहे. त्यामुळे खरवंडी येथील विठ्ठल आहेर यांच्या शेतातील विहिरीत दुपारच्या सुमारास पाण्याच्या शोधात आलेले काळवीट पडले. हि बाब आहेर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी लगेच वनविभागाचे वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ यांना फोन करून काळवीट विहिरीत पडल्याचे सांगितले. वनरक्षक वाघ यांनी सहकाऱ्यांबरोबर खरवंडी येथे हजर झाले व साधारण ३० ते ३५ फुट खोल विहिरीतून काळविटाला पाळण्याच्या साह्याने सुखरूप बाहेर काढले.काळवीट विहिरीच्या काठावर येताच जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. यावेळी वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ, वनकर्मचारी पोपट वाघ, कचरु आहेर, मनोहर दाणे, बापू वाघ, रविंद्र निकम तसेच खरवंडी येथील प्रवीण मोरे, सोनू आहेर, गणेश घायवट यांनी काळवीटाला विहिरीतून सुखरूप काढण्यासाठी मदत केली.या परिसरात मोठ्या प्रमाणात हरिण व काळवीट आहेत. उन्हाळ्यात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असतात यासाठी वनविभागाने या परिसरातील विहिरी ना तार कंपाऊंड किंवा कठडे बांधून द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहेत.ममदापूर, राजापूर परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई असली तरी ममदापूर संवर्धन राखीव मध्ये हरणांना तसेच वन्य पशु पक्षांना पिण्यासाठी पाणवठ्यांची व्यवस्था केलेली आहे. तसेच संवर्धन राखीव अंतर्गत सिमेंट प्लग, नालाबांध यांच्यामध्ये देखील मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने पशु पक्षांना पिण्यासाठी सद्या पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे. परंतु सदर काळवीट काळविटांची झुंज झाल्याने किंवा रात्री कळप सोडून गावाच्या दिशेने आल्याने व विहिरीचा अंदाज न आल्यामुळे सदर काळवीट हे 30 ते 35 विहिरीत पडले असावे. परंतु सुदैवाने विहीर कोरडी असल्याने हरीण जिवंत राहिले व कुठलीही गंभीर जखम झाली नाही. वन विभागाने हरणांसाठी खास पाळणा बनवलेला असून त्याद्वारे हरीण सुखरूप वर काढण्यात येते. खरवंडी येथील विहिरीत पडलेले काळवीट पाळण्याच्या साह्याने काढले व विहिरीच्या वर येताच त्याने जंगलाच्या दिशेने धुम ठोकली- ज्ञानेश्वर वाघ,वनरक्षक, राजापूर.(फोटो २६ काळवीट) विहिरीत पडलेले काळवीट.
विहिरीत पडलेल्या काळवीटाला मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 5:58 PM
ममदापूर : येवला तालुक्यातील खरवंडी येथे विहिरीत पडलेला काळवीटाला वनविभागाच्या कर्मचारी व ग्रामस्थांनी बाहेर काढल्याने जीवदान मिळाले.
ठळक मुद्दे ३५ फुट खोल विहिरीतून काळविटाला पाळण्याच्या साह्याने सुखरूप बाहेर काढले.