पाळे खुर्द : राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांमध्ये कळवण या आदिवासी तालुक्याचा समावेश न केल्याने कळवण तालुक्यातील जनतेत व आदिवासी बांधवांमध्ये नाराजी पसरली असून, पाऊस उशिरा झाल्याने पीक येणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांच्या यादीत कळवणचा समावेश करावा, अशी मागणी आमदार जे. पी. गावित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.आमदार जे. पी. गावित यांनी कळवण तालुक्यातील विविध गावांत जाऊन पिकाची पाहणी केली. यावेळी पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. तालुक्यात पावसाळा संपला तरी पावसाचे सरासरीच्या केवळ ५० टक्केपेक्षा कमी प्रमाण असल्याने तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी बंधारे कोरडेठाक असून, पावसाच्या भरवशावर केलेला हंगाम वाया गेला आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांनी पिके जागविण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र परतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्याने पिके करपून आर्थिक झळ सोसावी लागत आहे. भांडवल खर्च वाया गेला आहे. जनावरे आणि माणसांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.