वणी : कळवण तालुक्यातून टोमॅटो विक्रीसाठी गुजरात व मध्य प्रदेश येथे दररोज जात असल्याने या भागातील आर्थिक उलाढाल वाढली आहे. कळवण अभोणा, कनाशी पाडघण, शिरसमणी, ओतुर, साकोरे परिसरातील टोमॅटो सद्यस्थितीत गुजरात राज्यातील सुरत, भरुच, अहमदाबाद येथे विक्रीसाठी जात आहे. मध्य प्रदेश येथील इंदोर येथेही या टोमॅटोला मागणी वाढली आहे.
साधारणतः पिकण्याच्या पूर्वस्थितीतील टोमॅटो एका पिकअप्मध्ये भरून विक्रीसाठी पाठविण्यात येतात. हा माल पोहोचण्यासाठी आठ ते दहा तासांचा कालावधी लागतो. कॅरेटमधे पेपर टाकून त्यात टोमॅटो टाकून कॅरेटवर पेपरचे अच्छादन लावून पॅकिंग केले जाते. त्यामुळे अंतर्गत उष्णतामानाने टोमॅटोची लाली वाढते व हा दर्जेदार टोमॅटो विक्रीसाठी मागणीप्रमाणे पाठविण्यात येतो, अशी माहिती ट्रान्स्पोर्ट मालक संदीप शिंदे यांनी दिली. कळवण तालुक्यातील व्यापाऱ्यांबरोबर दिंडोरी तालुक्यातील व्यापारी यांच्यामार्फत हा टोमॅटो खरेदी केला जातो. सुमारे पन्नास पिकअप् टोमॅटो दररोज विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात मात्र कळवण तालुक्यात सध्या तुलनात्मक टोमॅटो उत्पादित होत आहे. आकारमान, दर्जा, प्रतवारी व रंग तसेच चव यात हा टोमॅटो उजवा आहे. या दर्जेदार टोमॅटोला मागणीही आहे. टोमॅटो खरेदी-विक्री प्रणालीमुळे आर्थिक उलाढाल गतिमान झाली आहे. समाधानकारक दरामुळे शेतकरी समाधानी आहेत.
-----------
पुणे, नगर जिल्ह्यात टोमॅटो खरेदीसाठी वर्दळ
टोमॅटोच्या खरेदी-विक्रीसाठी व्यापारी वर्गाची पुणे व नगर जिल्ह्यात वर्दळ सुरू आहे. कळवण तालुक्यातील काही भाग वगळता टोमॅटोच्या उत्पादनासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने जिल्ह्यातील काही व्यापारी घटकांनी अडत्याच्या माध्यमातून पुणे व नगर जिल्ह्यातून टोमॅटोची खरेदी सुरू केल्याने टोमॅटोच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहार प्रणालीत गतिमानता आली आहे. नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी टोमॅटोची रोपे टाकण्यास प्रारंभ झाला आहे, तर काही ठिकाणी रोपे पावसाच्या गणितावर अवलंबून आहेत.