लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखा यांच्यातर्फे आयोजित कै. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत कल्याण येथील अभिनय संस्थेची ‘दर्दपोरा’ या एकांकिके ने प्रथम क्रमांक पटकावला, तर आकार अकादमी मुंबई संस्थेची ‘१२ किमी’ आणि चंद्रपूर येथील नवोदिता संस्थेची ‘गोंद्या आणि कमूचा फार्स’ या एकांकिकांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. या एकांकिका स्पर्धेतील कलाकारांना ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.महाकवी कालिदास कलामंदिर येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या एकांकिका स्पर्धांचा गुरुवारी उत्साहात समारोप झाला. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी उपस्थित कलाकारांना मार्गदर्शन करताना आपण तांत्रिकदृष्ट्या कमी पडतो, याचा अभ्यास करून ही कमतरता आपल्या सशक्त अभिनयातून भरून काढणे आवश्यक आहे. सकस अभिनय सादरीकरणाच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे हे सांगताना कलाकारांनी प्रेक्षकांना नाट्यकृती देताना प्रेक्षकांना आवडते अशी कलाकृती न देता आपल्या मनातील कलाकृती द्यायला हवी तसेच प्रेक्षकांच्या मनातील कलाकृती द्यायला हे थिएटर अपुर्ण पडेल याकडेही जोशी यांनी लक्ष वेधले.अलीकडच्या काळात कलाकार प्रमुख अभिनेता आणि प्रमुख अभिनेत्री तसेच पारितोषिक डोळ्यासमोर ठेवून आपले सादरीकरण करतात हे चित्र बदलणे आवश्यक असून, नाट्यकलेचा आलेख उंचावा यासाठी नाट्यकलावंतानीच प्रेक्षकांना नाटक कसं पाहतात हे शिकविणे काळाची गरज असल्याचे सुहास जोशी यांनी यावेळी अधोरेखित केले. मंगळवार (दि. २३) पासून सुरू असलेल्या या एकांकिका स्पर्धेचे परीक्षण रंगकर्मी विद्या करंजीकर, सदानंद जोशी आणि संजय दळवी यांनी केले. सहाव्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या एकांकिका स्पर्धेत दर्दपोरा आणि बारा किमी या एकांकिकांनी वैयक्तिक गटातही पारितोषिके पटकावली असून, सर्वाेत्कृष्ट पार्श्वसंगीत (द्वितीय) राजस राहुल, उत्कृष्ट अभिनेत्री स्त्री (प्रथम) सोनाली मगर-नूर आणि दिग्दर्शनाचा प्रथम क्रमांक दर्दपोरा या एकांकिकेने मिळविला. तसेच ‘बारा किमी’ या एकांकिकेने सर्वाेत्कृष्ट पार्श्वसंगीत (प्रथम) राकेश जोशी, प्रकाश योजना (प्रथम) शीतल तळपदे आणि दिग्दर्शन (द्वितीय) डॉ. अनिल बांदिवडेकर ही वैयक्तिक गटातील पारितोषिके मिळविली. यावेळी व्यासपीठावर नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, उपाध्यक्ष शाहू खैरे, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांच्यासह मानसी देशमुख, डॉ. जयंत वाघ, निर्मला कुबल, विद्या करंजीकर, संजय दळवी, सदानंद जोशी आणि राजेंद्र जाधव उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक संजय दळवी आणि सदानंद जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अस्सल कलाकृती मांडण्याचा प्रयत्न व्हावा तसेच या एकांकिका स्पर्धेत विविध विषय हाताळले गेल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच प्रयोगादरम्यान नेमकेपणाने संगीत देण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील ढगे यांनी, तर आभार मानसी देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती मोराणकर यांनी केले. यावेळी नाट्यरसिक आणि कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कल्याणच्या ‘दर्दपोरा’ची बाजी
By admin | Published: May 26, 2017 12:41 AM