नाशिक : तेलंगणा राज्यातील वारंगलला सुरु झालेल्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेतील ५००० मीटर प्रकारात नाशिकच्या कोमल जगदाळे आणि संजीवनी जाधव यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली आहे.
वारंगलच्या या स्पर्धेत नाशिकच्या दोन्ही धावपटू ५००० मीटरच्या प्रकारात सहभागी झाल्या होत्या. दोन्ही धावपटू कन्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत यापूर्वीदेखील पदके मिळवलेली असल्याने त्यांना सुवर्णपदकाचे दावेदार मानले जात होते. स्पर्धेत प्रारंभापासून पहिल्या पाचात धावणाऱ्या कोमल आणि संजीवनीने अखेरच्या टप्प्यापर्यंत त्यांची आगेकूच कायम राखली. मात्र, रेल्वेकडून खेळणाऱ्या पारुल चौधरीने महाराष्ट्राच्या काेमल जगदाळेवर अवघ्या दीड सेकंदाने मात केली. रेल्वेच्या पारुलने ५००० मीटरचे अंतर १५ मिनिटे ५९ सेकंद ६९ शतांश सेकंदात स्पर्धा पूर्ण केली, तर कोमलने १६ मिनिटे ०१ सेकंद ४३ शतांश सेकंदात अंतर पूर्ण करीत दुसरा तर संजीवनीने १६ मिनिटे १९ सेकंद १८ शतांश सेकंदात तृतीय स्थान पटकावले. या दोन्ही धावपटूंना नाशिकचे साई कोच विजेंद्रसिंह यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्या नियमितपणे भोसला सैनिकी स्कूलच्या मैदानावर सराव करतात.
फोटो
१५कोमल संजीवनी
प्रशिक्षक विजेंद्रसिंह यांच्या समवेत संजीवनी आणि कोमल.