नाशिक : नाशिककर नशीबवान आहेत ज्यांना नाशिकमध्येच हिमालयासमान कार्य असलेले महान नाटककार लाभले. आपण त्यांची सावलीदेखील बनू शकत नाही, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करून प्रख्यात अभिनेते भरत जाधव यांनी नाटककार वसंत कानेटकर यांना अभिवादन केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेच्या वतीने ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन अभिनेते भरत जाधव आणि वसंत कानेटकर यांच्या स्नुषा अंजली कानेटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष शाहू खैरे, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे उपस्थित होते. नाट्य परिषदेच्या कालिदास कालामंदिर येथील कार्यालयात शनिवारी झालेल्या कार्यक्रमात अभिनेते भरत जाधव म्हणाले की, आजच्या काळात उत्तम लेखकांची गरज निर्माण झाली आहे. उत्तम संहिता फार कमी झाल्यामुळेच जुनी चांगली नाटके रंगभूमीवर आजही येत असतात. यावेळी अंजली कानेटकर यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या नाटकांना आजही मिळणारा प्रतिसाद त्यांचे लिखाण हे कालातीत असल्याची साक्ष देणारे असल्याचे सांगितले. आभार मानताना ढगे म्हणाले की, कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त परिषदेतर्फे दर महिन्याला उपक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमानंतर तेजस बिलदीकर यांच्या दिग्दर्शनाखाली केटीएचएम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘हिमालयाची सावली’ या नाटकातील प्रसंगांचे अभिवाचन केले. कार्यक्रमाला परिषदेचे पदाधिकारी विजय शिंगणे, राजेश भुसारे, विनोद राठोड, विशाल जातेगावकर, सुनील परमार आदी उपस्थित होते.
-----------------------------
फोटो (२९ पीएच ९२)
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त बोलताना प्रख्यात अभिनेते भरत जाधव. समवेत शाहू खैरे, अंजली कानेटकर, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी.