नाशिक : येथील नवीन बिटको कोविड रुग्णालयात अडीच महिन्यांपूर्वी नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती संशयित राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे यांनी थेट इनोव्हा कार चालवित शिरकाव केला होता. यामुळे रुग्णालयामधील काचेचा दरवाजा फुटला आणि ताजणे यांनी मोटारीतून खाली उतरत गोंधळ घातला होता. याप्रकरणी ताजणेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सोमवारी संध्याकाळी उशिरा ताजणे हे पोलीस ठाण्यात हजर (सरेंडर) झाले. त्यांना पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत ताजणे यांची रवानगी केली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान १५ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास संशयित राजेंद्र ताजणे यांनी आपली इनोव्हा कार बिटको कोरोना सेंटरच्या रॅम्पवरून चढवून रुग्णालयाच्या काचेच्या मुख्य दरवाजाला धडक दिली होती. यानंतर कर्मचाऱ्याच्या दिशेने येथील पेव्हर ब्लॉक उचलून फेकले होते. अचानक झालेल्या या प्रकारामुळे रुग्ण, नातवाईक, वैद्यकीय कर्मचारी वर्ग हादरून गेला होता. पोलिसांनी गुन्ह्यातील इनोव्हा कारदेखील जप्त केली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात ताजणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ताजणे अडीच महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. संध्याकाळी नाशिकरोड पोलीस ठाण्यात ताजणे शरण आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी सांगितले.
ताजणे यांनी पोलिसांकडून होणारी अटक टाळण्यासाठी थेट मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जही केला होता; मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावल्याने ताजणे यांची कोंडी झाली होती. दरम्यान, पोलीस कोठडीत ताजणे यांच्याकडून पोलिसांना या घडल्याप्रकाराबाबत काय माहिती मिळते हे लवकरच समोर येईल.