मनमाड : शहराला उपयुक्त असणाऱ्या करंजवण - मनमाड पाणीपुरवठा योजनेसाठी प्रकल्प समितीने मान्यता दिली. प्रकल्प समितीची बैठक मंत्रालयात झाली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत मनमाड पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी मंत्रालयात २५ फेब्रुवारी रोजी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या दालनात बैठक झाली. त्यात मनमाड पाणीपुरवठा योजनेबाबत सर्व आवश्यक असलेल्या पूर्तता करून ती योजना प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या कामी शासन स्तरावर सादर करण्यात आली. मंजुरी मिळण्याअगोदर प्रकल्प समितीची बैठक होणे आवश्यक असल्याने ती बैठक आयोजित करण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून मनमाड शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. यासाठी अगोदरच्या प्रकल्प समितीची बैठक होणे आवश्यक असल्याने ती बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस आमदार सुहास कांदे, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, वित्त विभागाचे सचिव पांडुरंग जाधव, सहसचिव नगर विकास विभाग, मुख्याधिकारी मनमाड सचिन पटेल, प्रकाश नंदनवरे, मुख्य अभियंता अलेवड, कक्ष अधिकारी मंत्रालय सुबोध मोरे, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी अधिकारी उपस्थित होते.
करंजवण - मनमाड पाणीपुरवठा योजनेसाठी मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2022 12:57 AM