पेठ : कोरोनाने ऑनलाइन शिक्षणाची गरज अधिक अधोरेखित केली. त्यामुळे शिक्षकांना तंत्रस्नेही हा गुण आत्मसात करणे भाग पडले. परंतु काही उपक्रमशील शिक्षकांनी तंत्रज्ञानात अगोदरच आपला नावलौकिक कमावत शिक्षणक्षेत्राला नवनवे आयाम बहाल केले आहेत. त्यातीलच करंजवण शाळेचे शिक्षक प्रकाश चव्हाण यांचे नाव घेता येईल. कोरोनाच्या महामारीत शाळा बंद असल्या तरी केवळ पाठ्यपुस्तकांवर अवलंबून न राहता आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक भागवणाऱ्या करंजवण येथील प्राथमिक शिक्षक प्रकाश लोटन चव्हाण यांना राष्ट्रीय पातळीवरील आयसीटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्लीमार्फत दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रकाश चव्हाण यांना जाहीर झाला. राष्ट्रीय स्तरावर आपल्या डिजिटल साहित्यनिर्मितीचा व मोफत प्रसाराचा ठसा उमटवत नाशिक जिल्ह्यात प्रथमच राष्ट्रीय आयसीटी पुरस्काराची मोहोर उमटली आहे.
करंजवण शाळेचे शिक्षक प्रकाश चव्हाण यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात वेगळ्या वाटेने काम करायला सुरुवात केली. बोरस्ते वस्ती, ता. निफाड येथील बंद पडणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेला त्यांनी आपल्या कौशल्याने राष्ट्रीय स्तरावर नावारूपास आणले. महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरण अंतर्गत दीक्षा ॲप घटक निर्मिती, एक स्टेप पोर्टलवर चव्हाण यांनी कामकाज केले आहे. जिल्हास्तरावर तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे ते सुलभक म्हणून कामकाज करतात. कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षण देण्याचे माध्यम झूम क्लास, कॉन्फरन्स कॉल, गूगल क्लास रूम याबाबत दिंडोरी तालुक्यातील शिक्षकांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिकमार्फत दर रविवारी होणाऱ्या आयसीटी कार्यशाळेत ते प्रशिक्षण देतात.
मुलांचे शिकणे सोपे व्हावे यासाठी १५ पेक्षा जास्त ॲप्लिकेशन तयार केले असून, प्ले स्टोअरवरून हजारो शिक्षकांसह पालकांनी ते डाऊनलोड केले आहेत. राज्यातील हजारो शाळेतील विद्यार्थी त्यांच्या ॲप्लिकेशनच्या साहाय्याने कोरोनाकाळात स्वयंअध्ययन करीत आहेत. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्वच विषयांच्या विविध शैक्षणिक घटकांवर त्यांनी व्हिडिओ तयार केले आहेत. राज्यभरातील हजारो शिक्षक या शैक्षणिक साहित्याचा वापर अध्यापनात करत आहेत. त्यांच्या यू-ट्यूब चॅनलला १५ लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या असून, त्यांच्या शैक्षणिक साहित्याचा वापर शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक इयत्तेच्या दर्जेदार अभ्यासिका ते दरवर्षी तयार करतात. व्हाॅट्सॲपद्वारे ते साहित्य राज्यातील शिक्षकांना मोफत वितरित करत असतात.
२०१३-१४ पासून प्रकाश चव्हाण यांच्या अविरत कार्याची उचित दखल मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांनी घेतली असून, सन २०१९ मध्ये देशभरातून २४, तर महाराष्ट्रातून तिघा शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नाशिक विभागातून प्रकाश चव्हाण यांची एकमेव निवड झाली. प्रकाश चव्हाण हे दिंडोरी तालुक्यातील करंजवण शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अध्यापनात तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावी वापर केला आहे.
फोटो- ०९ प्रकाश चव्हाण
राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार विजेते प्रकाश चव्हाण यांचा सन्मान करताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड.
090721\473809nsk_35_09072021_13.jpg
फोटो- ०९ प्रकाश चव्हाण राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार विजेते प्रकाश चव्हाण यांचा सन्मान करतांना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड