मनमाड : रेल्वे प्रशासनाने मनमाड रेल्वेस्थानकावर व्यापारी व कार्टिंग एजंटांसाठी शेतमाल व इतर वस्तू ठेवण्यासाठी असलेले दोन्ही गुड शेड, गोडाऊन पार्किंग ठेकेदाराला दिल्याच्या निषेधार्थ आणि पार्किंग हटवून दोन्ही गोडाऊन ते पार्सल माल ठेवण्यासाठी पुन्हा कार्टिंग एजंट यांना देण्यात यावे, या मागणीसाठी कार्टिंग एजंटांनी सोमवारपासून साखळी उपोषण सुरू केले. दोन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मनमाड रेल्वे स्टेशन हे जंक्शन असल्यामुळे येथून देशातील अनेक भागात जाणाºया गाड्या थांबतात. या गाड्यांमधून द्राक्षे, डाळिंब,कांदे यासह इतर अनेक वस्तू कार्टिंग एजंटांमार्फत परप्रांतात पाठविले जातात. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे पावसात भिजून शेतमाल व इतर वस्तू खराब होत असल्याने सर्वांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे दोन्ही गोडाऊन शेतमाल ठेवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावे, शिवाय पार्किंगमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने पार्किंग इतर ठिकाणी हलविण्यात यावे, रेल्वे गेट अरुयद असल्याने त्याच्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याने गेट मोठा करण्यात यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश असून, या मागण्या मान्य करण्यात याव्या यासाठी दिलीप नरवडे, डी. एस. शार्दुल, एस. ए. नरवडे, डी. एम. मुंढे, अनिस पठाण, संदीप चावरिया, तौसिफ खान यांनी उपोषण सुरू केले आहे.
मनमाडला कार्टिंग एजंटांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 1:53 AM