नाशिक : ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या निमित्ताने तत्कालीन परिस्थितीची चर्चा होत असली तरी ते पूर्ण सत्य नाही. अगोदर काश्मीर समजून घेण्याची आणि समजून सांगण्याची आवश्यकता आहे. काश्मीरचा इतिहास हा नेहमीच प्रेम, द्वेष, पुन्हा प्रेम आणि द्वेष असा राहिला आहे. त्याकरिता पूर्णसत्य समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार दीपक लोखंडे यांनी केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेच्या विवेक जागर उपक्रमांतर्गत लोखंडे यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी शाळा, महाविद्यालयांतून समजलेला काश्मीर यापेक्षा अधिक व्यापक असल्याचे सांगितले. येथील परंपरा, राज्यकारभार, संस्कृती आणि अतिक्रमणे, लढाया यांचा अंतर्गत जाऊन अभ्यास केला पाहिजे. इतिहास हा नेहमीच किचकट असतो. जे आपणाला सांगितले जाते तेच माहीत असते. तत्कालीन परिस्थिती आणि आजची समाजव्यवस्था, राजकीय समीकरणापलीकडे जाऊन हा विषय जाणून घेतला पाहिजे, असे लोखंडे यांनी सांगितले.
प्रास्ताविक श्यामला चव्हाण यांनी केले. परिचय प्रल्हाद मिस्त्री यांनी करून दिला तर सूत्रसंचालन अमित जोजारे, मयूर कुलकर्णी यांनी केले.