नाशिक : दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी एका महिलेच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न करत गळ्यामधील सोनसाखळी ओरबाडून पळ काढल्याची धक्कादायक घटना काठेगल्ली परिसरात घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सरला अमृतराव काळे या त्रिकोणी उद्यानापासून पायी जात असताना काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या अंगावर दुचाकी घेऊन जात लाइट चमकावून सुमारे अडीच तोळे वजनाची सोनसाखळी ओरबाडून पळ काढल्याची फिर्याद भद्रकाली पोलीस ठाण्यात काळे यांनी दिली आहे. फिर्यादीवरून अज्ञात सोनसाखळी चोरट्यांविरुद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीचा दिवा त्यांच्या चेहऱ्याच्या दिशेने बंद-चालू केल्याने त्यांनी डोळे मिटले व स्तब्ध उभ्या राहिल्या यावेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची अडीच तोळ्याची सोनसाखळी हिसकावली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. जी. काळे हे पुढील तपास करीत आहेत. काठेगल्ली परिसरात मागील काही दिवसांपासून चोरट्यांचा व टवाळखोरांचा वावर वाढला आहे. याभागात नाकाबंदी करून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होती आहे. पोलीस गस्तही काठेगल्ली, बनकर चौक, आकाशगंगा सोसायटी, त्रिकोणी गार्डन आदी परिसरात थंडावल्याची तक्रार या भागातील नागरिकांनी केली आहे. काही दिवसांपासून त्रिकोणी गार्डनजवळील अमृतनगर परिसरातील पथदीपही बंद असल्याने रात्रीच्या वेळी या भागात अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे चोरट्यांचे या भागात फावले असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.
काठेगल्लीमध्ये महिलेची सोनसाखळी ओरबाडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:18 AM