नाशिक : अंधाराचा फायदा घेत मोपेड दुचाकीवरून फिरत एकट्या,दुकट्या महिला, तरूणीला गाठून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांचा विनयभंग करणारा तसेच सोनसाखळी चोरी करून पळ काढणाऱ्या एका अल्पवयीन संशयिताला अखेर भद्रकाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या.पंधरवड्यापुर्वी काठेगल्ली, बनकर चौक, जनलक्ष्मी बॅँक परिसर, मानेकशानगर, द्वारका या भागात दुचाकीवरून भटकंती करत महिला, मुलींची छेड काढून विनयभंग करण्याचा प्रताप अल्पवयीन गुन्हेगार करत होता; मात्र अंधाराचा फायदा घेत तो पसार होत असल्याने त्याची फारशी ओळख पिडित महिला, मुलींना सांगता येत नव्हती. तसेच ज्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे आहे, त्या भागात अशा घटना घडत नव्हत्या,त्यामुळे पोलिसांपुढे या चोरट्याला शोधून काढण्याचे आव्हान उभे राहिले होते. वरिष्ठ पोलीस निरिक्षक मंगलसिंग सुर्यवंशी यांनी त्रिकोणी गार्डन परिसरात महिलांशी संवाद साधत त्यांच्यामधील भीतीचे वातावरण कमी करण्याता प्रयत्न केला, तसेच या भागात गस्त वाढवून येथील पोलीस चौकीवरील पोलिसांनाही विविध सूचना दिल्या आणि गुन्हे शोध पथकाला त्या चोरट्याचा माग काढण्याचा ‘टास्क’ सोपविला.माणेकशा नगर येथील रवींद्र विद्यालयाजवळ धनश्री गौरव काळे या मागील महिन्यात २५ तारखेला सकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता या अल्पवयीन गुन्हेगाराने दुचाकी थांबवून त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. तसेच २१ वर्षीय तरूणीला रात्रीच्या वेळी शाळेचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून या भामट्याने तिचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. या दोन्ही घटनांमध्ये ‘मोपेड बाईक’ हा एकमेव धागा पोलिसांना आढळून आला. यावरून पोलिसांनी शोध सुरू केला. यादरम्यान, हा भामटा गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह काठेगल्ली परिसरात सोमवारी (दि.२७) पोलिसांना आढळला. यावेळी पोलिसांनी वरील गुन्ह्यातील फिर्यादी महिला, तरूणीला त्यास दाखविले असता त्यांनी त्या भामट्याला ओळखले. पोलिसांनी शिताफीने त्यास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले. त्या विधीसंघर्षीत बालकाची बाल सुधारगृहालयात रवानगी करण्यात आले आहे.
काठेगल्लीत महिला, तरूणींना ‘टार्गेट’ करणारा ‘तो’ बालगुन्हेगार ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 5:55 PM
या भागात गस्त वाढवून येथील पोलीस चौकीवरील पोलिसांनाही विविध सूचना दिल्या आणि गुन्हे शोध पथकाला त्या चोरट्याचा माग काढण्याचा ‘टास्क’ सोपविला.
ठळक मुद्देन्हे शोध पथकाला ‘टास्क’ सोपविला.