पेठ : तळपत्या उन्हाच्या काहिली नंतर बरसणारा पहिला पाऊस आणि त्याबरोबर रानावनात उगवणारी कवळीची भाजी म्हणजे आदिवासी जनतेसाठी रानभाज्यांचा श्रीगणेशा असतो. अगदी कमी दिवस आणि अल्प आयुष्य असलेल्या या कवळीच्या भाजीची चव चाखण्यासाठी खवय्ये अक्षरश: आतुर होत असतात. पेठ, सुरगाणा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्याबरोवर विविध प्रकारच्या रानभाज्यांची रेलचेल सुरू होत असते. आयुर्वेदात सर्वाधिक महत्त्वाचे स्थान असलेल्या अनेक प्रकारच्या भाज्या रानावनात उगवत असतात. पहिल्या पावसाबरोबर दर्शन होते ते कवळीच्या भाजीचे. याच भाजीचा पहिला नैवेद्य दाखवून नागरिक रानभाज्या खाण्यास सुरु वात करतात. पाऊस पडल्यानंतर फक्त एक किंवा दोनच दिवस कवळीच्या भाजीचे दर्शन होत असते. त्यामुळे ही भाजी आणण्यासाठी पहाटेपासून जंगलाची वाट धरावी लागते. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक व घातक मूलद्रव्यांचा स्पर्शही नसलेल्या कवळीच्या भाजीची चव चाखण्यासाठी सर्वच आतुर झालेले असतात. कवळीच्या भाजीनंतर शेवळा, करटोला, झारझुरा, बोखर, फांग, भुईफोड, वार्थट, आळींब, माट, चाईचा मोर यांसारख्या एका पेक्षा एक चविष्ट रानभाज्या दाखल होत असतात.----------------------शहरातही कवळीचे आकर्षण कायमआदिवासी व ग्रामीण भागातून नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने शहरात स्थलांतरित झालेल्या चाकरमान्यांनाही कवळीच्या भाजीचे मोठे आकर्षण असते. पहिला पाऊस पडल्यावर आपापल्या नातेवाइकांना खास कवळीची भाजी वानोळा पाठवण्याची काळजी घेतली जाते. यावर्षी लॉकडाऊनमुळे मिळालेल्या सुट्ट्यांमुळे बहुतांश नोकरदार गावाकडे आले असल्याने कवळीच्या भाजीचा आस्वाद घेत आहेत. आठवडे बाजार बंद असल्याने ग्रामीण भागातून कवळीच्या भाजीची आवक घटल्याने स्थानिकांना मिळणाऱ्या रोजगारावर यावर्षी पाणी सोडावे लागले असले तरी चांगला पाऊस झाल्याने सर्वांनाच पुरेशा प्रमाणात या भाजीचा आस्वाद घेता आला.
पहिल्या पावसातील ‘कवळी’ने रानभाज्यांचा श्रीगणेशा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 10:29 PM