संजय शहाणे
इंदिरानगरप्रशासनाने नायलॉन मांजावर बंदी घातली असली तरी, त्याचा सर्रास वापर केला जात असल्याने हा मांजा पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. झाडावर अडकलेला नायलॉन मांजा वर्षानुवर्ष नष्ट होत नसल्याने, त्यामध्ये पक्ष्यांचे अडकण्याचे प्रमाण वाढले आहे. इंदिरानगर भागात अशाच एका झाडावर मांजात कावळा अडकला असता, त्याला चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तत्परतेने जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे. इंदिरानगरमधील कौशल्य अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहणारे प्रशांत चंद्रात्रे यांचा चार वर्षांचा मुलगा अर्णव हा गॅलरीत खेळत होता. समोरच्या एका झाडावर पंधरा, वीस कावळे एकाच जागेवर गिरक्या घालत असल्याची बाब त्याच्या लक्षात आली. बराच वेळ निरीक्षण केल्यानंतर एक कावळा फाद्यांमध्ये अडकला असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने तातडीने हा प्रकार वडिलांना सांगितला. विशेष म्हणजे अर्णवला स्पष्ट बोलता येत नसल्याने, त्याने हातवारे करीत बोबड्या भाषेत झाडावर कावळा अडकलेला असल्याचे सांगितले. चंद्रात्रे यांनीदेखील तातडीने हा सर्व प्रकार अग्निशामक दलाला दूरध्वनीवरून सांगितला. काही वेळातच अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून त्यांनी कावळ्याची दहा मिनिटांत सुटका केली. केवळ अर्णवच्या तत्परतेने कावळ्याचे प्राण वाचल्याने अग्निशामक दलाचे भीमाशंकर खोडे, एन. एल. गांगुर्डे, एस. बी. निकम, बी. बी. काकड यांनी त्याचे कौतुक केले.