नाशिक : ‘दारिद्र्याच्या संसाराचे नंदनवनही करते आई,चिल्ल्यापिल्ल्यांना प्रकाश देण्या दिव्यासारखी जळते आई...’अशा एकाहून एक सरस कविता सादर करीत कवींनी ‘काव्यमेवा’ ही मैफल रंगवली. कवी किरण भावसार, प्रा. जावेद शेख, प्रशांत केंदळे, रवींद्र मालुंजकर, राजेंद्र उगले यांनी या मैफलीत सहभाग घेतला. निवृत्तीनगर परिसरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव समितीच्या वतीने या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब सानप, निवृत्ती मते, अनिल वाघ मंचावर उपस्थित होते. यावेळी कवी किरण भावसार यांनी - ‘उपटून फेकलेला आलो रुजून येथे..मातीत मायभूच्या सगळा भूगोल माझा...’ही मातीशी घट्ट नाळ जुळवणारी कविता पेश केली. प्रा. शेख यांनी मातेच्या कर्तृत्वाचा गौरव करताना-‘आई देऊन प्रसववेदना तुला मी तुझ्याच पोटी पुन:पुन: जन्म घेईनतुझ्या आयुष्याची कावड मी आयुष्यभर वाहत राहीन...’ अशी भावना व्यक्त केली. प्रशांत केंदळे यांच्या ‘बाप-लेकीची कहाणी’ या कवितेतील-‘कुणी ऐकला का सांगा कधी बापाचा हंबरलेक सोडताना घर त्याचे फुटते अंबर...’ या ओळींनी मैफलीचा समारोप झाला. यावेळी रसिका खुळे, साक्षी गढवी यांनी गीते सादर केली. व्यंगचित्रकार अवि जाधव, कलादिग्दर्शक आशिष देवरे आदिंसह रसिक उपस्थित होते. कवी रवींद्र मालुंजकर यांनी निवेदन केले. विजय देवरे, चारुदत्त पाथरे, योगेश कासार, संतोष अहिरराव, सुनील मते, अनिल राऊत, हरीश हिरे, सुनील सहाणे आदिंनी कार्यक्रमाचे संयोजन केले. (प्रतिनिधी)
रसिकांना गवसला ‘काव्यमेवा’!
By admin | Published: October 20, 2015 9:54 PM