वणी : सप्तशृंगीमाता व जगदंबादेवीचा जयघोष करीत शनिवारी वणीतून हजारो कावडधारी मार्गस्थ झाले. मात्र प्रतिवर्षीपेक्षा या वर्षी कावडधारकांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. गडावर कोजागरी पौर्णिमेला कावडीतुन आणलेल्या तिर्थाद्वारे अभिषेक घालण्याची गेल्या अनेक वर्षापासुनची परंपरा आहे. त्या परंपरेस अनुसरून प्रतिवर्षी हजारोंच्या संख्येने विविध राज्यातील कावडधारक मजल दरमजल करून शेकड़ो किलोमीटरची पदयात्रा करत तांब्याच्या गडव्यांमधे विविध पवित्र नदयांचे तीर्थ घेऊन सप्तशृंगीच्या चरणी नतमस्तक होतात. या प्रवासामधे स्वयंसेवी संस्था व सामाजिक उपक्र म राबवेणाऱ्या घटकाकडुन फराळ पाण्याची व्यवस्थाही करण्यात येते. पायात घुंगरू, भगवे वस्त्र, सुशोभित कावड़ी व मुखात भगवतीचा जयघोष असा हजारो कावडधारकांचा लवाजमा भक्तिभावाने सहभागी होऊन निर्भेळ आनंद प्राप्त करतात. मात्र या वेळी प्रतिवर्षीच्या तुलनेत कावडधारकांच्या संख्येत घट झाल्याचे दिसुन येते. कोजागरी पौर्णिमेला गड़ावर जाण्यापूर्वी वणीच्या जगदंबेचे दर्शन घेण्याकारिता कावडधारक येतात. मनमाड, सिन्नर, चांदवड, दिंडोरी त्रंबकेश्वर असलोद व परिसरातील कावडधारकांनी जगदंबा देवी मंदिरात हजेरी लावली.
सप्तश्रृंगगडावर कावडधारक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 2:19 PM