परिचय महिला संस्थांचाशाळेच्या २२ वर्षांनंतर भेटलेल्या मैत्रिणी, त्यांनी स्थापन केलेला व्हॉट्सअॅप ग्रुप, त्यातून काहीतरी वेगळे करावे या विचारातून सुरू झालेले छोटेछोटे उपक्रम व त्यातून आकाराला आलेली ‘ठेवा संस्कृतीचा’ संस्था. आॅगस्ट २०१६ पासून या ग्रुपतर्फे विविध उपक्रमास प्रारंभ झाला. या ग्रुपच्या माध्यमातून प्रारंभी सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम करण्याची कल्पना पुढे आली. अभिनेत्री पल्लवी पटवर्धन, गायत्री बेळगे, वैशाली साठे, सोहा लाळे या मैत्रिणींना हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यानंतर समाजातील विविध स्तरातील महिलांना त्यांच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडी उसंत मिळावी व आपली संस्कृती, परंपरा, सण व व्रतवैकल्य यांची जपणूक करता यावी, या उद्देशाने ‘ठेवा संस्कृतीचा’ विविध उपक्रम राबवू लागले. संस्थेने आजवर भोंडला, श्रीसुक्त पठण, गरबा-दांडिया, दीपोत्सव, संक्रांतीचे हळदी-कुंकू, उखाणे, पाककला, फुलांची रांगोळी अशा स्पर्धा, कार्यक्रम राबविले. महिला दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. यात ग्रुपच्या प्रत्येकीने तिच्या भागातील कष्टकरी स्त्रियांचा सन्मान केला.‘गहिरीसम्भवा- एका स्त्रीचा प्रवास’ या काव्यसंग्रहातील व कवी किशोर पाठक यांच्या काव्यसंग्रहातील निवडक कवितांचा अभिवाचनपर काव्यवाचन हा प्रयोग ग्रुपमधील मैत्रिणींना घेऊन केला. त्याचबरोबर ‘शोध स्वत:चा’ ही लेख स्पर्धा घेतली असता सख्या लिहित्या झाल्या. वुमन्स बाइक रॅलीमध्ये ग्रुपमधील १०० मैत्रिणींनी सहभाग घेऊन. पहिला नंबर पटकावला. याशिवाय काळा राममंदिरात चैत्र महिन्याचे औचित्य साधून सामूहिक रामरक्षा पठण कार्यक्रम करण्यात आला. चैत्रगौरीचे हळदी-कुंकू व गौरींचे खेळ खेळले याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मदर्स डे वेगळ्या रीतीने साजरा केला. असे अनेक प्रकारचे उपक्रम ठेवा संस्कृतीच्या ग्रुपमधून राबविण्यात आले. प्रत्येक महिन्याला एक असा उपक्रम हा ग्रुप राबवत असतो. त्याचे वेगळेपण जपत साजरे करतात. ग्रुपतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री हेमा जोशी व मुख्याध्यापक सुचेता सौंदाणकर यांचा सत्कार करण्यात आला.