पंढरीची वारी ही एक निरंतर आणि अखंड अशी सांप्रदायिक परंपरा आहे. वारकरी संप्रदायाचा तो मोलाचा आध्यामिक आणि धार्मिक ठेवा आहे. वारीत कोणत्याही प्रकारच्या जातीभेदाला थारा नसतो. एकप्रकारे सर्वधर्मसमभाव येथे जपला जातो. संत श्रेष्ठ निवृत्तिनाथ संस्थानचा अध्यक्ष म्हणून काम करीत असताना वारीतील वारकऱ्यांची आणि पर्यायाने साधू-संतांची तद्वतच पांडूरंगाची सेवा करण्याचे कार्य माझ्या हातून घडले याचे आत्मिक समाधान वाटते. दोन तपांपेक्षा जास्त काळ वारी करण्याचा अनुभव आला. तेव्हा वारकºयांच्या सुख-दु:खात सहभागी होता आले. आर्थिक परिस्थिती योग्य नसताना खेड्यापाड्यातील गोरगरीब लोक पंढरीच्या वारीत सहभागी होतात. एकप्रकारे विलक्षण असा सोहळा असतो. त्यांच्या जिवाला एकच ध्यास लागलेला असतो तो म्हणजे पंढरीच्या पांडूरंगाचे दर्शन घेण्याचा होय. वारीमध्ये कुठल्याही अन्य विषयांवर चर्चा होत नसते, चर्चा होते फक्त परमार्थाची. त्याचप्रमाणे वारीमध्ये मनुष्याच्या अंगी स्वंयपूर्णत: येते. प्रत्येकजन हा स्वत:चे काम स्वत:च करीत असतो. दुसºयावर अवलंबून नसतो. समजा घरी स्वत:च्या हातानेही प्यायला पाणी न घेणारा मनुष्य येथे काही वेळा स्वत: विहिरीतून पाणी काढून दुसºयांना पाणी वाटतांना दिसतो. त्र्यंबकेश्वरपासून ते पंढरपूरपर्यंत लांबचा पल्ला असल्याने साधारणत: २७ दिवस लागतात. यावेळी मनुष्याचे स्वभाव एकमेकांना कळतात. स्वत:मधील गुणदोषाचा मनुष्य विचार करू लागतो. भजनं गात सतत चालत राहिल्याने आत्मिक व आध्यात्मिक सुख तर लाभतेच, परंतु चालल्यामुळे शरीरातील व्याधीही नष्ट होतात. विशेष म्हणजे भारतात कोणत्याही तीर्थक्षेत्री जाताना भाविक हे शक्यतो वाहनाने जातात. परंतु पंढरीला मात्र पायीच जाण्याची प्रथा आहे. काही लोक वाहनाने जातात परंतु या ठिकाणी लांबच लांब दर्शन रांगेत उभे राहूनदेखील खूप चालणे होते. त्यामुळे दीर्घ प्रतीक्षेनंतर पांडूरंगाचे दर्शन झाल्याचा एक वेगळाच आनंद भाविकांच्या आणि वारकºयांच्या चेहºयावर दिसून येतो.संत निवृत्तिनाथ वारीत त्र्यंबकेश्वरहून सुमारे ३० वर्षांपूर्वी साधारणत: ३०० वारकरी सहभागी होत पुढे ही संख्या पंढरपुराला जाईपर्यंत दोन ते तीन हजारपर्यंत होत असे. आता मात्र वारीच्या प्रारंभीच त्र्यंबकेश्वर येथून सुमारे १५ हजार वारकरी निघतात आणि वाटेत अन्य ठिकाणी वारकरी सहभागी होत होत ही संख्या ४० हजारांपेक्षा जास्त होते.- मुरलीधर पाटील(लेखक संत निवृत्तिनाथ संस्थानाचे माजी अध्यक्ष आहेत.)
वारी हा आध्यात्मिक धार्मिक ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:17 AM