३८ वर्षीय वसीम यांना सुरुवातीला ताप येऊ लागला त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडून औषधोपचार केले, पण फरक पडला नाही. त्यानंतर त्यांनी नाशिकला येऊन तपासणी केली त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. एचआरसीटी स्कोर १२ पर्यंत होता. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . उपचारादरम्यान त्यांना डॉक्टरांनी रेमडेसिविर इंजेक्शनचे डोसही दिले, पण प्रकृतीत सुधारणा झाली नाही. प्रकृती अधिकच बिघडत असल्याने डॉक्टरांनी त्यांंच्या नातेवाइकांना टॉसिलिझमब हे इंजेक्शन देण्याचा पर्याय सुचविला, पण शेजाऱ्यांचा अनुभव गाठीशी असल्याने त्यांच्या नातेवाइकांचे मन यासाठी धजावले नाही, पण तरीही मिळाले तर देऊ म्हणून इंजेक्शनचा सर्वत्र शोध घेतला, पण कुठेही ते मिळाले नाही. रुग्णाची स्थिती गंभीर होत असताना वसीम यांच्या पुण्याच्या बहिणीने नाशिक शहरातील एका होमिओपॅथी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे सुचविले. लहान बंधू मोईन अत्तार यांनी संबंधित डाक्टरांशी संपर्क साधून त्यांना संपूर्ण स्थिती सांगितली. सुरुवातीला त्या डॉक्टरांनी साबुदाण्यासारख्या गोळ्या दिल्या, पण त्या गोड लागत असल्याने रुग्णास ठसका येत असल्याचे जाणवले, त्यानंतर त्यांनी औषधात बदल करून पातळ औषध दिले. रुग्णांच्या नातेवाइकांनी सर्व सूचनांचे पालन केले आणि दोन दिवसांनंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसू लागले. आज वसीम अत्तार पूर्णपणे बरे झाले असून, निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन घरी पोहोचले आहेत. ॲलोपॅथीला होमिओपॅथी औषधांची जोड मिळाल्याने महागडे इंजेक्शन न घेताही कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली.
महागडे इंजेक्शन न घेताही केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:16 AM