डांगसौंदाणे : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे या परिसराला वरदान ठरलेले केळझर (गोपाळसागर) धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या सांडव्यावरून सुमारे ३५ क्युसेस पाणी आरम नदीपात्रात विसर्ग होत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता आर.आर. निकुंभ यांनी दिली आहे.
बागलाणच्या पश्चिम पट्ट्याबरोबर सटाणा शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची भूमिका असलेले केळझर (गोपाळसागर) धरण रविवारी (दि. १२) ओव्हरफ्लो झाले. धरण क्षेत्रात गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या संततधार पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. ५७२ दलघफू पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या केळझर धरणाच्या सांडव्यावरून सद्यस्थितीत सुमारे ३५ क्युसेस पाणी आरम नदीपात्रात विसर्ग होऊन नदी दुथडी भरून वाहत आहे. या पाण्यामुळे परिसरातील नदीपात्रात लगत असलेल्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. या पूर पाण्यामुळे सटाणा शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मदत होणार आहे.