नाशिक - शिक्षणाच्या उत्तमोत्तम संधी प्राप्त करुन देतानाच सुविधांचा लाभ पुरविणारे केंद्रीय विद्यालय महापालिकेला मिळणार असून केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास संसाधन मंत्रालयाच्या पथकाने त्यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या तीन शाळांची नुकतीच पाहणी केली आहे. या निवासी केंद्रीय विद्यालयामुळे महापालिका शाळांमधील स्कॉलर विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त होण्यास मदत होणार आहे.काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर नाशिक दौ-यावर आले असता, त्यांच्यापुढे बंद पडत चाललेल्या महापालिका शाळांबाबत गांभीर्याने चर्चा झाली होती. यावेळी महापालिकेला केंद्रीय विद्यालय देता येईल काय, याची चाचपणी जावडेकर यांनी केली होती. त्यानुसार, चार जणांचे पथक सुरुवातीला नाशिक दौ-यावर आले होते तर गेल्या शनिवारी (दि.९) उपसंचालकांसह आणखी चौघांचे पथक नाशिकला येऊन गेले. सदर पथकाने महापालिकेच्या बी. डी. भालेकर हायस्कूल, मोटकरवाडी येथील शाळा क्रमांक ६६ आणि जेतवननगर येथील शाळा क्रमांक ११० या शाळांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान, पथकाने शाळांची इमारत, तेथील वर्गखोल्या, त्यांची लांबी-रुंदी, शाळांचे प्रांगण, मुला-मुलींसाठी असलेले स्वच्छतागृह, शाळांमध्ये देण्यात आलेल्या सोयीसुविधा यांची बारकाईने तपासणी केली. सदर शाळांच्या मुख्याध्यापकांकडून त्यासंबंधीचा छायाचित्रांसह अहवालही मागविण्यात आला. त्यानुसार, वडनेर दुमाला येथील केंद्रीय विद्यालयात महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी केंद्रीय पथकासमोर अहवालाचे सादरीकरण केले. सदर अहवाल आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला सादर होणार असून त्यानंतर एका शाळेच्या इमारतीत केंद्रीय विद्यालय साकारण्यास मान्यता मिळणार आहे.
नाशिक महापालिका शाळांमधील स्कॉलर विद्यार्थ्यांसाठी सुरू होणार केंद्रीय विद्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 2:22 PM
मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा पुढाकार : केंद्र सरकारच्या पथकाकडून तीन शाळांची पाहणी
ठळक मुद्दे शिक्षणाच्या उत्तमोत्तम संधी प्राप्त करुन देतानाच सुविधांचा लाभ पुरविणारे केंद्रीय विद्यालय महापालिकेला मिळणार महापालिकेच्या बी. डी. भालेकर हायस्कूल, मोटकरवाडी येथील शाळा क्रमांक ६६ आणि जेतवननगर येथील शाळा क्रमांक ११० या शाळांची पाहणी