खामखेडा : शासनाने नुकतेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील एक सिलिंडरधारकांचा केरोसीन पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांचे हाल होत आहे. हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. या पूर्वी शासनाकडून दोन सिलिंडरधारकांचा रॉकेल पुरवठा बंद करण्यात येऊन शहरी व ग्रामीण असा समान कोटा करण्यात आला होता. आता शासनाने रेशनकार्डवरील एक सिलिंडरधारकास केरोसीन बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याने ग्रामीण भागावर अन्याय झाल्याची चर्चा होताना दिसून येत आहे. शहरी भागातील प्रत्येक बंगल्यावर पाणी गरम करण्यासाठी सौर पॅनल व घरामध्ये इन्हर्टर बसाविण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात चूल पेटविण्याचा किंवा लाइटचा प्रश्न निर्माण होत नाही. या उलट ग्रामीण भागामध्ये परिस्थिती आहे. ग्रामीण भागामध्ये अगदी मोजक्या लोकांकडे सौर बम्ब किंवा इन्हर्टर आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना दररोज सकाळी पाणी गरम करण्यासाठी चूल पेटवावी लागते. आणि तसेच ग्रामीण भागामध्ये काही वेळेस रात्रीचे भारनियमन असते, तेव्हा दिव्यासाठी केरासीनची गरज भासते. तेव्हा चूल व दिव्यासाठी ग्रामीण भागातील जनतेला केरोसीन महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात शेतवस्तीवर वास्तव्य करतात. ग्रामीण भागामध्ये एक सिलिंडरधारकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. बऱ्याचशा कुटुंबाला हे एक सिलिंडर दीड-दाने महिने जाते. त्यांचे बारा महिन्यांमध्ये बारा सिलिंडर पूर्ण होत नाहीत. तेव्हा शासनाने एक सिलिंडरधारकास पुन्हा पूर्वीप्रमाणे रेशन कार्डावरील केरोसीनचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)
केरोसीन पूर्ववत द्यावे
By admin | Published: October 29, 2016 12:28 AM