( सुदीप गुजराथी) नाशिक - ‘वस्त्र नव्हे विचार’ अशा शब्दांत महात्मा गांधीजींनी ज्या खादीचे वर्णन केले, त्या खादीचे कापड नुसते स्वत: वापरायचेच नाही, तर ते स्वत:च्या हाताने तयार करण्याचे काम शहरातील ४० गांधीवादी करीत आहेत. रोज सुमारे एक तास अंबर चरख्यावर सूतकताई करीत ही माणसे पर्यावरण रक्षणासह स्वावलंबनाचा मंत्रही जोपासत आहेत.महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात गरीब भारतीयांचा स्वाभिमान जागा करीत त्यांना चरख्यावर सूतकताईचा कर्मयोग सांगितला. यामुळे परदेशी कापडाची मागणी तर घटलीच; शिवाय देशातील हजारो गरिबांच्या हातांना काम मिळाले, स्वावलंबनाचा मंत्र मिळाला. गांधीजींनी आयुष्यभर खादी वापरली. त्यांचा हा विचार देशातील हजारो गांधीवादी आजही अंमलात आणतात. नाशिकमध्ये सन २००८ मध्ये येथील सर्वोदयी कार्यकर्त्यांनी ‘जीवन उत्सव’ या पर्यावरणपूरक जीवनशैलीविषयीच्या आगळ्या उपक्रमाला सुरुवात केली. त्यावेळी अनेक कार्यकर्ते एकत्र येऊन सूतकताईविषयी चर्चा झाली. त्यातूनच ज्येष्ठ कार्यकर्त्या वासंती सोर यांना ‘कताई मंडळ’ स्थापन करण्याची कल्पना सुचली. सोर या पूर्वीपासून अंबर चरखा कताईचे प्रशिक्षण देतच होत्या. अशा प्रशिक्षित मंडळींनी स्वत: चरखा विकत घेऊन घरात कापसाच्या पेळूपासून रोज किमान एक तास सूतकताई करावी, त्यातून तयार झालेले सूत वर्ध्याच्या ग्रामसेवा मंडळाकडे देऊन त्या बदल्यात खादीचे कापड आणावे आणि त्यातून स्वत:साठी वस्त्रे शिवावीत, अशी मंडळाची कल्पना होती. त्यानुसार शहरातील चाळीस गांधीवादी रोज सूतकताई करतात. त्यांत वासंती सोर यांच्यासह मुकुंद दीक्षित, दिलीप धुळेकर, अजित टक्के, गौतम भटेवरा आदिंचा समावेश आहे. दर महिन्याला मंडळाचा एक सदस्य सर्वांनी तयार केलेल्या सुताच्या गुंड्या वर्ध्याला घेऊन जातो आणि तेथून खादीचे कापड व पेळू घेऊन येतो. हे सदस्य या कापडापासून तयार केलेलेच सदरे, पायजमे, साड्या, रुमाल, बेडशिटस् वापरतात.
स्वत:साठीची खादी स्वत:च्या हातांनी...
By admin | Published: October 01, 2015 11:25 PM