नाशिक : आर्ट आॅफ लिव्हिंगचा मंगळवारी (दि.२९) भाऊबीज-दीपावली मीलन सत्संग सोहळा रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास आटोपला अन् जमलेल्या शेकडो साधकांनी तपोभूमी सोडण्यास सुरुवात केली. अवघ्या काही वेळेतच तपोभूमीत निरव शांतता अन् ‘साधुग्राम’भोवती किर्रर्र अंधार पसरला. यावेळी परदेशस्थ दोन भारतीय महिला साधक त्यांची कार सुरू करण्यासाठी आटापिटा करतात, मात्र त्यांना यश येत नाही. वेळ वाढू लागते अन् त्यांच्याही पोटात भीतीचा गोळा उठतो. गस्तीवर असलेल्या दोघा पोलिसांची मदत महिला साधकांकडून मागितली जाते अन् ‘खाकी’ संकटसमयी धावून येते. सत्संग सोहळ्याला दोन महिला व त्यांच्यासोबत एक पुरुष असे तिघे साधक आपल्या लहान बाळासमवेत आले होते. सत्संग आटोपल्यानंतर हे तिघेही वाहनतळात उभ्या असलेल्या त्यांच्या कारजवळ गेले. महिला साधक पाठीमागे बसल्या आणि पुरुष साधकाने कार सुरू केली, मात्र कार सुरू झाली नाही. वृक्षराजींमध्ये असलेल्या वाहनतळात संपूर्ण अंधार आणि रातकिड्यांची किरकिर यामुळे महिला साधक काहीशा घाबरल्या होत्या. यावेळी एका महिलेने धाडस करत मुख्य रस्त्यापर्यंत येत पथदीपाच्या प्रकाशात उभे राहून रात्रीच्या पोलीस गस्तीच्या वाहनाला थांबण्याचा इशारा केला. आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस वाहन हवालदार मुनीर काझी, नाईक विनोद लखन यांनी तत्काळ थांबविले. महिलेने लखन यांना अडचण सांगितली व मदत मागितली. यावेळी त्यांच्या मदतीसाठी बिपीन शिंगाडा आणि त्यांचे मित्र सुरेश भावसार आले. चौघांनी मिळून पुन्हा कारला धक्का देत सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र कार काही सुरू होत नव्हती. पाउण तासानंतर काझी यांच्या ‘मॅकेनिझम’ला यश आले.बॅटरीच्या वायरींना आलेल्या कार्बनमुळे विद्युत पुरवठा इंजिनपर्यंत होत नव्हता. परिणामी कारचे इंजिन स्टार्ट होत नसल्याची बाब मुनीर काझी व लखन यांच्या लक्षात आली. या दोघांनी बॅटरीच्या दोन्ही वायरी काढून लहानशा दगडावर घासत पुन्हा धन-ऋण आपल्या कौशल्याने तपासून बसविल्या आणि महिला चालकाला मोटार सुरू करण्यास सांगितले आणि त्यांचा प्रयोग यशस्वी झाला.
काळोखात महिला साधकांच्या मदतीला धावली ‘खाकी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 1:04 AM