नाशिक : ‘‘संपुर्ण देश थांबला, पण तूू थांबला नाहीस, या संकटापुढे तू वाकला नाहीस... आमच्यासारखा तू सुध्दा लढत आहेस, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, देशाला स्वच्छ आणि सुरक्षित ठेवत आहेस, महाराष्ट्र पोलिसाच्या प्रत्येक सैनिकाचा तुला मनापासून सलाम...’ हे वाक्य ऐकू येतात राज्याच्या पोलीस दलाने खास लोकांसाठी जारी केलेल्या संदेशाच्या लघुचित्रफितीत. राज्याच्या ‘खाकी’ने सफाई व वैद्यकिय कर्मचाऱ्यांना या चित्रफितीद्वारे अनोखा ‘सॅल्यूट’ करत त्यांचे मनोबल उंचावले आहे.कोरोनाचे संकट दारात येताच अवघे राज्य आणि देशाला हादरा बसला. या संकटाशी मुकाबला करण्यासाठी वैद्यकिय यंत्रणा आणि गावपातळीपासून महानगरापर्यंतची सरकारी यंत्रणेतील सफाई कामगार युध्दपातळीवर झटू लागले. कोरोना नियंत्रणात यावा अन् सर्वांचा जीव भांड्यात पडावा, यासाठी पोलीस दलासह वैद्यकिय कर्मचारी, सफाई कामगारदेखील अहोरात्र प्रयत्नशील आहेत. राज्यातील ‘खाकी’चा सैनिक ज्याप्रमाणे कोरोनाकाळात रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत आहे, त्याचप्रमाणे लाल, हिरवे, पिवळे जॅकेट परिधान केलेले हातात झाडू अन् कचरासंकलन करणारी हातगाडी घेत रस्तोरस्ती भटकंती करत सार्वजनिक स्वच्छता राखणारे सेवक अन् विविध सरकारी, खासगी दवाखान्यात राबणारे वैद्यकिय क्षेत्रातील हात अद्यापही थकलेले नाहीत. या ख-याखु-या सेवकांच्या कामाचा हेवा राज्यातील पोलीस दलालाही वाटला आणि पोलीस दलाने थेट एक स्वतंत्र चित्रफितच तयार केली अन् त्या चित्रफितीला नाव दिले, ‘खास लोकांसाठी खास संदेश’! पोलिस दलाचा हा संदेश नक्कीच या सेवकांचे मनोबल उंचविणारा ठरणार आहे.
‘खाकी’चा भावपूर्ण सलाम : ‘आमच्यासारखा तू सुध्दा लढाई लढत आहेस...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 3:15 PM
राज्याच्या ‘खाकी’ने सफाई व वैद्यकिय कर्मचाऱ्यांना या चित्रफितीद्वारे अनोखा ‘सॅल्यूट’ करत त्यांचे मनोबल उंचावले आहे.
ठळक मुद्देपोलीस दलाला ख-याखु-या सेवकांच्या कामाचा हेवा ‘खास लोकांसाठी खास संदेश’