नामपूर : बागलाण तालुक्यातील खामलोण येथे गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेताला पाणी देणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि.१७) आक्रमक पवित्रा घेत नामपूर येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक मारत आंदोलन केले.विजेचा लपंडाव गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी सहन करीत होते. परंतु गुरुवारी शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा स्फोट झाला आणि त्यांनी महावितरणच्या नामपूर येथील विद्युत केंद्रावर जाऊन आक्रमक होत आंदोलन केले. सदर आंदोलनात कांदा पिकासाठी सतत आठ तास वीजपुरवठा मिळावा, अशी मागणी संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. तसेच मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात आक्रमक अशा आंदोलनास आपणास सामोरे जावे लागेल असा इशारादेखील संतप्त शेतकऱ्यांनी दिला.
वेळेवर मोटारींचे बिल भरूनदेखील वीज वेळेवर मिळत नाही. त्यासाठी रात्री जावे लागते असा सूर व्यक्त होत होता. उपकार्यकारी अभियंता सूर्यवंशी यांच्या आश्वसनानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अविनाश सावंत, नामपूर ग्रामपंचायत सदस्य विलासराव सावंत, माजी सरपंच जगदीश सावंत, दीपक सावंत, प्रमोद सावंत, गणेश खरोटे, दीपक सावंत, कांदा उत्पादक संघटनेचे दिगंबर धोंडगे, वैभव धोंडगे, सागर सोनवणे, रवींद्र धोंडगे, गणेश धोंडगे, प्रवीण धोंडगे, सोपान धोंडगे, जगन्नाथ धोंडगे, रावसाहेब सोनवणे, गणेश धोंडगे, सुनील सोनवणे, ज्ञानेश्वर धोंडगे, माजी सैनिक सचिन धोंडगे, अजिंक्य धोंडगे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.