जिल्हा कॉँग्रेसमध्ये ‘खदखद’ कायम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:34 AM2018-12-30T00:34:23+5:302018-12-30T00:34:52+5:30
तीन राज्यांमध्ये एकसंघटितपणे लढून विजय खेचून आणणाऱ्या कॉँग्रेसमधील नाशिक जिल्ह्यातील गटबाजी अद्याप कायम असून, त्याचा प्रत्यंतर खुद्द उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी व अखिल भारतीय कॉँग्रेसचे सचिव चेल्लर वामसी चांदरेड्डी यांनीच घेतला आहे.
नाशिक : तीन राज्यांमध्ये एकसंघटितपणे लढून विजय खेचून आणणाऱ्या कॉँग्रेसमधील नाशिक जिल्ह्यातील गटबाजी अद्याप कायम असून, त्याचा प्रत्यंतर खुद्द उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी व अखिल भारतीय कॉँग्रेसचे सचिव चेल्लर वामसी चांदरेड्डी यांनीच घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या जिल्ह्याच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे व ज्येष्ठ नेते दिगंबर गिते यांच्यात वरिष्ठ-कनिष्ठ दर्जावरून झालेल्या वादातून थेट प्रकरण हमरी-तुमरीवर आल्याने त्याची खमंग चर्चा होत आहे.
तीन राज्यांतील निवडणुका जिंकल्यामुळे कॉँग्रेसने लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन महाराष्टत संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित करून बूथनिहाय कार्यकर्ते नेमणुकीवर भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून उत्तर महाराष्टÑाची जबाबदारी चांदरेड्डी यांच्यावर सोपविण्यात आली. चांदरेड्डी यांनी गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्टÑाची पदाधिकाºयांची बैठक घेतल्यानंतर जिल्हानिहाय आढावा घेण्यास सुरुवात केली. त्याचाच भाग म्हणून तालुका, गाव व बूथनिहाय कार्यकर्ते नेमणुकीचा आढावा घेण्यासाठी रेड्डी यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी आठ वाजता शासकीय विश्रामगृहावर सर्व तालुका पदाधिकारी, आघाडी प्रमुख, तालुका निरीक्षकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत पानगव्हाणे यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते यांची कळवण तालुका निरीक्षक म्हणून नेमणूक केल्याचे सांगताच गिते यांनी वयाचा व पक्ष कार्याचा विचार करून जबाबदारी सोपवावी, असे सुनावले. त्यावर पानगव्हाणे यांनीही गिते यांच्या ‘सिनीअर’की वर प्रश्न उपस्थित करून ‘आपण दलाली करत नाही किंवा कॉँग्रेसवर आपले पोट चालत नाही’ असे एकेरी भाषेत गिते यांचा पाणउतारा केला. प्रकरण हमरीतुमरीवर गेल्याने पदाधिकाºयांमध्ये चुळबुळ सुरू झाली तर पक्षनिरीक्षक चांदरेड्डी यांनी वाद पाहून कपाळावर हात मारून घेतला.
कॉँग्रेसमधील या वादाची चांगलीच चर्चा सुरू झाली असून, मध्यंतरी जिल्हाध्यक्ष पानगव्हाणे यांची गच्छंती करावी यासाठी विरोधी गटाने केलेल्या प्रयत्नात गिते यांचाही समावेश होता. त्यामुळे तो राग पानगव्हाणे यांनी डोक्यात धरून त्यांचा पाणउतारा केला असला तरी, पानगव्हाणे यांनी पक्षाची वाट लावल्याचे पुरावे विरोधी गटाने गोळा करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात बूथनिहाय नेमण्यासाठी कार्यकर्ते मिळत नसल्याने अक्षरश: मतदार यादीतील मतदारांचे नावे बूथ प्रमुख म्हणून टाकून रेकॉर्ड मेंटेन करण्यात आल्याचीही खुली चर्चा आता होऊ लागली आहे.