चांदोरी : येथील गोदावरी नदीकाठी वसलेले महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या खंडेराव महाराज मंदिर व परिसराचा कायापालट होत आहे. यामुळे लवकरच हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.नाशिक शहरापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर चांदोरी गाव आहे. खळखळून वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठी खंडेराव महाराजांचे मंदिर आहे. या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व आहे. जेजुरीला जाण्याअगोदर चांदोरी येथील खंडेराव महाराजांचे दर्शन घ्यावे लागते. यामुळे राज्यभरातून भाविक चांदोरी येथे येत असतात.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाकडे चांदोरी जिल्हा परिषद गटाचे सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनी पाठपुरावा करून या मंदिरास ब वर्गाचा दर्जा प्राप्त झाला. वनारसे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून मंदिराच्या व परिसराच्या विकासासाठी निधी मंजूर करून आणला. सभामंडप, परिसराचे सुशोभीकरण, भक्तनिवास, तरणतलाव, नदीतीरावर घाट बांधण्यासाठी निधी मंजूर झाला असून, त्याची कामे प्रगतिपथावर आहेत. तसेच जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करून गोदावरी नदीपात्रात बोटिंग क्लब सरू करण्याचे काम प्रस्तावित असल्याचे वनारसे यांनी सांगितले. (वा. प्र.)