लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेत एकाच विभागात तीन वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आयुक्तांनी काढले असून प्रामुख्याने नगररचना, बांधकाम आणि ड्रेनेज विभागात खांदेपालट करण्यात आला आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.महापालिका प्रशासनाने बांधकाम, नगररचना आणि ड्रेनेज विभागात प्रामुख्याने खांदेपालट केला आहे. त्यात नगररचना विभागात सहा वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणारे कार्यकारी अभियंता संजय घुगे यांची बदली सिडको व सातपूर विभागातील ड्रेनेज विभागात करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर बांधकाम विभागात कार्यरत कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पी. बी. चव्हाण यांच्याकडील पदभार बांधकाम विभागातील नाशिक पश्चिम व सिडको विभागातील आर. एस. गांगुर्डे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. घरकुल योजनेसंबंधीचा पदभार मात्र पी. बी. चव्हाण यांच्याकडे कायम ठेवण्यात आला आहे. यापूर्वी सातपूर व पूर्व विभागात बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंता एस. वाय. पवार यांच्याकडे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ट्रॅफिक सेलचा पदभार सोपविण्यात आला आहे. सध्या पंचवटी विभागातील बांधकाम विभागात कार्यरत कार्यकारी अभियंता पी. एम. गायकवाड यांच्याकडे स्मार्ट सिटी प्रकल्प आणि पंतप्रधान आवास योजना यांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. ज्यांचा कार्यकाळ एकाच विभागात तीन वर्षांहून अधिक काळ झालेला आहे, अशाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, अत्यावश्यक विभाग म्हणून पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या नसल्याची माहिती प्रभारी प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली. दरम्यान दुसऱ्या टप्प्यात विविध संवर्गातील कर्मचारी बदल्यांचे संकेत दिले आहेत.निवडणुकीसाठी सुमारे सहाशे कर्मचारी मालेगावीमालेगाव महापालिकेची निवडणूक येत्या २४ मे रोजी होत असून, निवडणूक कर्मचारी म्हणून नाशिक महापालिकेतील सुमारे ६०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दोन-तीन दिवस नाशिक महापालिकेत कर्मचाऱ्यांची कमतरता भासणार आहे. परिणामी, पालिकेच्या कामकाजावरही परिणाम होणार आहे.
महापालिकेत खांदेपालट
By admin | Published: May 23, 2017 1:44 AM