गुळवंच : सिन्नर तालुक्यातल्या गुळवंच येथील ग्रामदैवत खंडोबा व बिरोबा महाराजांच्या तीन दिवसीय यात्रौत्सवासास रविवार (दि.२३) पासून प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.खंडोबा व बिरोबा महाराजांच्या मंदिरास रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम यात्रेचे प्रमुख आकर्षण असते. या बारा गाड्या ओढण्यासाठी येथील देवाचे भक्त खंडेराव साबळे यात्रौत्सवाच्या आठदिवस आधीपासून तयारी करतात. रविवारी सायंकाळी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. बारागाड्या पाहण्यासाठी परिसरातून मोठी गर्दी झाली होती. परंपरेनुसार खंडोबाचा जयजयकार करून मिरवणूक झाल्यानंतर यात्रेत थाटलेल्या दुकानातून खरेदी-विक्रीची उलाढाल सुरू झाली. रात्री ९ वाजता करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते.खंडोबा महाराजांची उपासना झाल्यानंतर सोमवारी (दि. २४) रोजी गावातील धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या बिरोबा महाराजांचा नैवद्य व काठी मिरवणूक निघणार आहे. यात्रोत्सवात गावातून नोकरी-व्यवसायानिमित्ताने बाहेरगावी गेलेले भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. बोकडबळी, लोटांगण, पाठीत गळ टोचणे आदि पारंपारिक नवस पूर्तीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आहे. यात्राकाळात डफवाले व वाघे - मुरळी यांना विशेष मागणी असते. यामुळे तीन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात वातावरण नादमय झालेले असते. यात्रेनिमित्ताने सोमवारी दुपारी कुस्त्यांची दंगल होणार आहे.
गुळवंच येथे खंडोबा-बिरोबा यात्रोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 5:54 PM