सातपूर : यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात भंडाऱ्याची उधळण करीत सातपूर कॉलनीतील श्री खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. अश्वनृत्य या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले.सालाबादप्रमाणे या वर्षीदेखील सातपूर कॉलनीतील खंडेराव महाराज मंदिरात चंपाषष्ठी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. खंडेराव महाराज मित्रमंडळाच्या वतीने सकाळी मंदिरात महाभिषेक, हवन, रुद्राभिषेक व परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. सभागृह नेते सलीम शेख हे पालखी खांद्यावर घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी प्रभाग सभापती उषा शेळके, मधुकर जाधव, रामहारी संभेराव, मंडळाचे अध्यक्ष गोपाळ बगडे, किसन खताळे, कारभारी बोडके, शिवाजी शहाणे, बाळासाहेब पोरजे, मच्छिंद्र बर्वे, सचिन शेवाळे, रामचंद्र बोरसे, सागर शेळके, किरण बद्दर, अशोक सपकाळे आदिंसह भाविक सहभागी झाले होते. ़विविध धार्मिक विधी व रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे रात्री वाघ्या मुरळी यांच्या जागरण गोंधळाचा कार्यक्र मदेखील आयोजित करण्यात आला होता. सातपूर पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यात्रोत्सव यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. दरम्यान, नाशिक शहरातील वकीलवाडी तसेच काठेगल्ली येथील खंडेराव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. त्यानिमित्ताने सकाळी अभिषेक दुपारी महाप्रसाद असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. या मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. (वार्ताहर)
सातपूरला खंडोबा महाराज यात्रोत्सव उत्साहात
By admin | Published: December 20, 2015 12:13 AM