गोरख घुसळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : पावसाळ्याचे तीन महिने संपत आले तरी येवला तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. मका, सोयाबीन, मूग, बाजरी, भुईमूग ही पिके करपली आहेत. निम्म्यापेक्षा जास्त पिकांनी केव्हाच माना टाकल्या असून उर्वरित पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याने शेतकरीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.पावसाचे सहा नक्षत्र जेमतेमच राहिले असून, ३१ आॅगस्टपासून सुरू झालेले पूर्वा नक्षत्रही कोरडे चालल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून, उत्तरा व हस्त नक्षत्रावर या व पुढील हंगामाची मदार यावर अवलंबून आहे.यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल असा दावा हवामान खात्याने तसेच पंचांगकर्त्यांनी केल्याने शेतकरीवर्गाने मोठ्या आशेने खरिपाची तयारी केली; मात्र हवामान खाते व पंचांगकर्त्यांची ही भविष्यवाणी खोटी ठरली. येवला तालुक्यात तब्बल महिनाभर उशिराने पावसाचे आगमन झाले. झालेल्या अत्यल्प पावसावर शेतकºयांनी महागडी बियाणे, खते घेऊन खरिपाची पेरणी केली; मात्र पावसाची सर्वच नक्षत्रे जेमतेम पडल्याने व चालू असलेले नक्षत्रही कोरडे जात असल्याने शेतकरीवर्गाचा भ्रमनिरास झाला आहे. गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी दिल्याने खरीप पिकांनी माना टाकल्या असल्याने केलेला खर्च वाया जाणार असल्याची भीती निर्माण झाली असून, शेतकरी खचत चालला आहे. गेल्या सहा सात वर्षांपासून तालुक्यात भयाण दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. या अस्मानी संकटामुळे तालुकावासीयांची प्रगती खुंटत चालली आहे.येवला तालुक्यात गेल्या दहा-अकरा वर्षांपासून पावसाचे प्रमाण खूपच कमी झालेले असल्याने दुष्काळ पाचवीलाच पूजलेला आहे. शेतकरीवर्ग दरवर्षी नव्या उमेदीने शेती कसत आहे; मात्र कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी उत्पादित केलेल्या शेतमालास कवडीमोल मिळणाºया भावामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने विश्रांती घेतल्याने पिके करपू लागली आहेत. आता पाऊस आला तरी उत्पन्नात मोठी घट येणार आहे.- रघुनाथ मेंगाणे, शेतकरी, पाटोदापावसाचे मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा (फाल्गुनी), उत्तरा (फाल्गुनी), हस्त अशी नऊ नक्षत्रे असतात; मात्र दिनदर्शिकेत मृग ते स्वाती अशी अकरा नक्षत्रे दिली जातात. त्याचप्रमाणे मान्सूनपूर्व पावसाचे रोहिणी हे नक्षत्रदेखील धरले जाते. प्रत्येक नक्षत्रास एक एक प्राणी वाहन म्हणून दिला जातो. हत्ती, बेडूक आणि म्हैस या वाहनांना भरपूर पाऊस तर उंदीर, गाढव, मेंढा यांना कमी पाऊस अपेक्षित असतो, तर मोर आणि घोडा असला तर मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असतो, असे जुने जाणकार शेतकरी सांगत आहे. पावसाची सहा नक्षत्रे कोरडीठाकच गेली असेच म्हणावे लागेल. या नक्षत्रांमध्ये जेमतेम पाऊस पडल्याने व आता सुरू असलेले पूर्वा नक्षत्रही अजून पडते न झाल्याने, उत्तरा व हस्त या नक्षत्रांवर आता सगळी मदार अवलंबून आहे.
येवला तालुक्यात खरीप पिकांनी टाकल्या माना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 11:04 PM
पाटोदा : पावसाळ्याचे तीन महिने संपत आले तरी येवला तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. मका, सोयाबीन, मूग, बाजरी, भुईमूग ही पिके करपली आहेत. निम्म्यापेक्षा जास्त पिकांनी केव्हाच माना टाकल्या असून उर्वरित पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याने शेतकरीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे : सहा नक्षत्र जेमतेमच; उत्तरा, हस्त नक्षत्रावर मदार