सायखेडा : मृग नक्षत्राच्या सुरुवातीला दमदार सुरुवात केलेल्या पावसाने अचानक ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांची पेरणी आणि नगदी पिकांची लागवड लांबली असून, पाऊस पडत नसल्याने बळीराजा चिंतित आहे.जून महिना सुरू झाला आणि पावसाने हजेरी लावली होती. पाऊस वेळेवर दाखल झाल्याचा आनंद शेतकऱ्यांना झाला मात्र हा आनंद फार दिवस टिकला नाही, केवळ पाच दिवस जोरदार पाऊस बरसला आणि पावसाने दडी मारली. त्यामुळे पेरणीपूर्व मशागती झालेल्या जमिनीत बी पेरण्याची कामे शेतकऱ्यांना थांबवावी लागली. जमिनीत वापसा झाली; पण पाऊस पडत नसल्याचे चित्र निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना पेरणी थांबवावी लागली.
या हंगामात टमाटे, कोबी, फ्लॉवर, भाजीपाला यासारखे नगदी पिके घेतली जातात. चार पैसे मिळाले तर पुढील हंगामातील पिकांना भांडवल उभे करता येते मात्र पाऊस नसल्याने नगदी पिकांची लागवड थांबली आहे. रोपे तयार असूनही पाणी नसल्याने पीकलागवड करता येत नाही.मागील वर्षीच्या तुलनेत निम्मा पाऊस पडला आहे. मागील वर्षी जून महिन्याच्या मध्यवर्ती जिल्ह्यात सगळीकडे चांगला पाऊस पडला होता. पिकांची पेरणी आणि नगदी पिकांची लागवड वेळेत झाली होती. यंदा मात्र निम्मादेखील पाऊस पडला नसल्याने पेरणी करता येत नाही. अशा परिस्थिती पेरणी केली तर ती वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या आहेत.जून महिन्यात पावसाला जोरात सुरुवात झाल्याने यंदा पाऊस वेळेवर पडेल अशी अपेक्षा होती. पण अवघ्या चार दिवसात पाऊस थांबला आणि मशागत करून ठेवलेल्या जमिनीवरील पेरणी थांबवली. नगदी पिकांची लागवड करायचा हंगाम असलातरी पाऊस पडत नसल्याने पिकांची लागवड झालेली नाही. खरीप हंगाम लांबला तर वर्षातील सर्व पिके उशिरा येऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे लवकरात लवकर पाऊस पडला पाहिजे.-दत्तू भुसारे, शेतकरी, भुसे