नाशिक : सन २०२१-२२च्या खरीप हंगामात नाशिक विभागात एकूण २१ लाख ०२ हजार ७९१ हेक्टर क्षेत्र पीक पेरणीसाठी प्रस्तावित करण्यात आले असून, गतवर्षी २० लाख ६१ हजार ४६ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली होती. विभागात शेतकरी कापसाला अधिक प्राधान्य देत असल्याने यावर्षी कापसासाठी ९ लाख २१ हजार ७४० हेक्टर इतके क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्या खालोखाल मका पिकाला प्राधान्य दिले जात आहे. कडधान्याला दर अधिक मिळत असला तरी पावसाचे प्रमाण आणि या धान्याची उत्पादकता यामुळे विभागातील शेतकरी या पिकांची पेरणी करण्यास फारसे उत्सुक नसल्याने या पिकांचे क्षेत्र अल्प प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाने आगामी खरीप हंगामाचे नियोजन केले असून, शेतकऱ्यांनीही जमिनीची मशागत आणि इतर तयारी सुरु केली आहे. नाशिक विभागात खरिपाचे सर्वसाधारणपणे २१ लाख १९ हजार २६ हेक्टर इतके क्षेत्र असून, गतवर्षी काही ठिकाणी पावसाने दगा दिल्याने कमी क्षेत्रावर पेरणी झाली होती. विभागातील शेतकरी मका, सोयाबीन, कापूस, बाजरी आदी पिकांना अधिक प्राधान्य देत असल्याने या पिकांसाठी अधिक क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. बाजरीपेक्षाही ज्वारीला खुल्या बाजारात अधिक दर मिळत असला, तरी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या चारही जिल्ह्यांतील शेतकरी ज्वारीचे पीक घेण्यास फारसे उत्सुक नसल्याचे दिसते. विभागात केवळ ८३६.७२ हेक्टर इतक्याच क्षेत्रावर ज्वारीची पेरणी केली जात असून, त्यात नंदुरबार (३३० हे.) आणि जळगाव (४०१ हे.) या दोन जिल्ह्यांचा अधिक वाटा आहे. नाशिक जिल्ह्यात केवळ ८.७२ हेक्टर इतक्याच क्षेत्रावर ज्वारीची पेरणी केली जात आहे. जळगाव वगळता उर्वरित सर्वच जिल्ह्यांंमध्ये भाताची पेरणी करण्यात येत असून, विभागात एकूण १२३२.३३ हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. गतवर्षी एकूण १,२०० हेक्टरवर भाताची पेरणी करण्यात आली होती.
चौकट -
पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हे)
मका - ४१६९.२०
सोयाबीन - १५५८.९२
कापूस - ९२१७.४०,
बाजरी - १६०१.००,
ज्वारी - ८३६.७२.
तूर - ३८९.०२
मूग - ६३१.०२,
भुईमूग - ४२३.८९