ममदापुर : खरवंडी शिवारात गट नंबर ९० मध्ये सोमवारी (दि.१०) मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात शिकाऱ्यांनी खरवंडी, ममदापुर, भारम या गावाच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जंगलाच्या शेजारी हरिणाची शिकार केली.या परिसरात सुमारे सहा महिन्यांपुर्वी देखील याच ठिकाणी दोन हरिणाची शिकार झाली होती. भारम चौफुलीवर रस्त्याच्या शेजारी निलेश सौंदाणे यांनी रात्री एकच्या सुमारास गाडीचे लाईट या भागात पाहिले पुन्हा तिन विजेच्या सुमारास चौफुलीवर लाईट मध्ये हरिण दिसले. तेव्हा सौंदाणे यांनी शेजारी तसेच गावातील लोकांना आणि वनविभागाच्या अधिकाºयांना फोन करून सदर घटना सांगितली. परंतु तो पर्यंत हरिणाची शिकार करून संबंधित पसार झाले होते. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थांनी पहाणी केली असता जंगलात गाडी फिरल्याचे निशाण व हरिणाचे रक्त आढळून आले.वन विभागाच्या गस्त घालणारे अधिकारी याच्या ही गोष्ट निदर्शनास आली नाही हि शोकांतिका म्हणावी लागेल. लाखो रु पये खर्च करून वनविभागाने ममदापुर संवर्धन राखीव केले. परंतु शिकारी शिकार करतात त्यामुळे या परिसरात वनविभागाने चौकशी साठी गस्त घालून बाहेरून रात्री येणारे वाहनांची चौकशी सुरू करावी अशी मागणी होत आहे. घटणेचा तपास वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी याच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रसाद पाटील, वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ हे करत आहेत.खरवंडी, ममदापुरच्या मध्यभागी असलेल्या लहाणु मोरे यांच्या शेतात आम्हाला रक्ताचे डाग आढळून आले आहे. या ठिकाणी रात्री निलेश सौंदाणे यांना इंडिका गाडी दिसली. तसेच वनविभागाच्या हद्दीत देखील आम्हाला काही पुरावे आढळले आहे. आमची गस्त या भागात नेहमीच असते . घटनेची माहिती मिळताच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, परंतु तोपर्यंत शिकारी फरार झाले होते. या घटनेचा तपास चालू आहे.संजय भंडारीवन परिक्षेत्र अधिकारी, येवला.
येवला तालुक्यातील खरवंडी- भारम चौफुलीवर अज्ञातांकडून हरणाची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 5:46 PM