नाशिक : खिदमत फाऊंडेशन या संस्थेने कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांच्या घरी किराणा माल पुरवला. या संस्थेने दोन महिन्यातच ४५० लोकांना किराणा वस्तू उपलब्ध करुन दिल्या होत्या. तसेच मुस्लिम बांधवांच्या रमजान पर्व काळातही या संस्थेने गोरगरीब कुटुंबांना उपवास करण्यासाठी पहाटेच्यावेळी ‘सहेरी कीट’ पुरवले होते. तसेच मुंबई नाका पोलिसांना हॅण्ड सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोव्हज्, फेसशिल्डचे ‘आरोग्य कीट’ पुरवले होते. भीमवाडी येथील झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेतील बाधितांना कपड्यांचे वाटप केले होते.
मुस्लिम संस्थांकडून स्थलांतर करणाऱ्या मजुरांना मदतीचा हात
जुने नाशिक, वडाळा रोड, पखाल रोड या भागातील जश्न ग्रुप, न्यू उम्मीद, गरीब नवाज फाऊंडेशन, सेडार ग्रुपसह अन्य काही संस्थांनी एकत्रित येत लॉकडाऊन काळात स्थलांतर करणाऱ्या गोरगरीब परप्रांतीय मजुरांना पाथर्डी फाटा, विल्होळी फाटा, वाडीवऱ्हे येथे सलग महिनाभर दररोज सुमारे दीड हजार लोकांना अन्नाची पाकिटे तसेच प्रवासात लागणारा खाऊ, बिस्किटे, पाणी बाटली, फळांचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. यावेळी विविध संस्थांच्या स्वयंसेवकांनी रमजान पर्वचे कडक उपवास करत खऱ्या अर्थाने मानवसेवा करत माणुसकीचा धर्म जोपासत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले होते.